सडोली खालसा : सडोली खालसा (ता. करवीर) येथील स्टॅम्प विक्रेते अरुण आवळे व त्यांच्या पत्नी शकुंतला आवळे यांच्या दातृत्वाने ‘लेक वाचवा’ मोहिमेला बळ देण्याचे काम केले आहे. त्यांचा मुलगा अनिकेत याच्या स्मृतिदिनी त्यांनी सडोली परिसरातील २२ गावांत जन्माला येणाऱ्या १५५ मुलींच्या नावे प्रतिमुलगी एक हजार ठेव ठेवून शासनाच्या ‘लेक वाचवा’ अभियानास हातभार लावला आहे. ही एकूण रक्कम १ लाख ५५ हजार इतकी आहे. आवळे दाम्पत्याने सुरू केलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.नातेवाइकांच्या स्मृतिदिनी केवळ भोजनावळ व भेटवस्तू वाटप करणे ही प्रथा समाजात सुरू आहे; पण समाजातील मुलींची घटती संख्या व यामुळे येणारे संकट टाळण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे, या भावनेतून त्यांनी अनुसरलेला ‘लेक वाचवा’ उपक्रम प्रशंसनीय आहे.अरुण आवळे यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. घरची गरिबी व अपंगत्व यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. त्यांनी करवीर तहसीलदार आॅफिस येथे स्टॅम्प विक्री व अन्य व्यवसाय सुरू केला. त्यांना अनिकेत व अश्विनकुमार, अशी दोन मुले आहेत. अनिकेत याचे चार वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. मुलग्याच्या आठवणीची ज्योत सतत राहण्यासाठी त्याच्या पहिल्या स्मृतिदिनी आरे, गाडेगोंडवाडी, कारभारवाडी, सडोली, बाचणी, हिरवडे, हसूर, भाटणवाडी, पाटेकरवाडी, मांजरवाडी, म्हालसवडे, आरळे, कांचनवाडी, चाफोडी, गर्जन, चव्हाणवाडी, भोगमवाडी, तेरसवाडी, मांडरे, सावर्डे, सडोली (दुमाला) अशा २२ गावांतील जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे बॅँक आॅफ इंडिया, के.डी.सी.सी. बॅँक व इतर बॅँकांमध्ये १००० रुपयांची ठेव पावती असे १ लाख ५५ हजार इतकी रक्कम ‘लेक वाचवा अभियान’ म्हणून डिपॉझिट केली. यामुळे निश्चितच ‘लेक वाचवा’ अभियानास बळ मिळेल. पुढील स्मृतिदिनी वृद्ध महिला, पुरुष व मुलांसाठी अनाथाश्रम, वृद्धाश्रम सुरू करण्याचा मानस आहे.
मुलींच्या नावे ठेव ठेवून जपली मुलाची स्मृती
By admin | Updated: January 1, 2015 00:14 IST