आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : काळासोबतच समाजाची गरज लक्षात घेऊन आता प्रकल्प उभे राहिले पाहिजेत. फक्त आर्थिक मदत करूनच सामाजिक उपक्रम उभे राहू शकत नाहीत, तर त्यांना वेळही देणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी सावली केअर सेंटरच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाशिक येथील ‘नॅब’ संस्थेच्या अंध मुलांनी रोप, मल्लखांब प्रात्यक्षिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
मंत्री पाटील म्हणाले, ‘सावली’सारख्या संस्था या काळाची गरज बनल्या आहेत. यासारख्या संस्थांना सुरुवातीच्या काळात आर्थिक मदत केल्यास, त्या नक्कीच बहरतात. या संस्था समाजाला प्रेरणा देणारे काम करीत असल्याने त्या अनेकांशी जोडल्या जातात. मात्र या संस्थांना आर्थिक मदतीसह प्रत्येकाने वेळ देणे आता गरजेचे झाले आहे. सावली संस्थेची भव्य व सुसज्ज इमारत उभी राहत आहे. या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
सावली केअर सेंटरचे प्रकल्प संचालक किशोर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले; तर सुहास बांदल यांनी ‘ग्रीन’ संकल्पनेविषयी सविस्तर माहिती दिली. सोनाली नवांगुळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, शिवपाल बनसोडे, मनोहर शर्मा, प्रकाश मेहता यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
डोळसांना विचार करायला भाग पाडले....
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिकमधील रोप मल्लखांब खेळणारा नॅबच्या अंध विद्यार्थ्याने डोळसांना विचार करायला भाग पाडले. उंच अशा दोरीवर प्रात्यक्षिक करून त्याने सर्वांनाच थक्क केले. मानवी मनोरा करून त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कल्पनेतून या संघाचा जन्म झाल्याचे संघाचे प्रशिक्षक यशवंत जाधव यांनी यावेळी सांगितले. खेळाडूंना टिचकी आणि टाळ्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. संस्थेच्या सुगंधा शुक्ल यांनी प्रत्येक प्रात्यक्षिकाची सविस्तर माहिती देत होत्या. सर्व मुलीं अंध असल्याने समोर कोण पाहते, व्यासपीठ कसे आहे याचा विचार न करता फक्त स्पर्शाच्या माध्यमातून त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांच्या प्रत्येक प्रात्यक्षिकाला सर्वांनी जोरदार टाळ््या वाजवून प्रतिसाद दिला. या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यासह ‘कोहाम’ संस्थेमधील मुला-मुलींनी व कर्मचाऱ्यांनी गाण्यांचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्रीभ्रूणहत्या व पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला.