राजाराम कांबळे - मलकापूरवर्षातून दोन महिन्यांसाठी येणाऱ्या रानमेव्यांची डोळ्यात आसवं आणून वाट बघायची आणि त्या दोन महिन्यांत जेवढा जंगलातील रानमेवा पदरात पाडून घेता येईल तेवढा घ्यायचा, त्याची विक्री करून मिळणाऱ्या चार पैशांतून वर्षभरासाठी संसाराला लागणाऱ्या वस्तूंची साठवणूक करायची. रानमेवा धनगर बांधवांच्या जगण्याचा आधार ठरत आहे.चालूवर्षी अवकाळी पाऊस, वादळी वारा, आभाळ येणे, असे चमत्कारिक प्रकार घडल्याने त्याचा रानमेव्यांवर परिणाम झाला आहे. परिणामी करवंद, आळू, जांभूळ, काजू, आंबा या फळांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या धनगर बांधवांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. शाहूवाडी तालुक्यात ३०१६५.८१.२० हेक्टर एवढी वनखात्याची जमीन आहे. या जमिनीवर विशाळगड, चांदोली, अणुस्कुरा, आंबा, कांडवण, गिरगाव, आदी ठिकाणी मोठी जंगले वसली आहेत. या जंगलाशेजारी तालुक्यातील शंभर धनगरवाडे वसले आहेत. हे जंगल वेगवेगळ््या वृक्षांनी व्यापले आहे.करवंदे, जांभळे, काजू, नेर्ली, आळू, रतांबे, तोंदली, शेबत्याळ, तमालपत्री, औषधी वनस्पती, आदी रानमेव्यांची विपुल प्रमाणात भर पडत आहे. मोठ्या जंगलांमुळे जंगलातील गवे, डुकरे यांच्या अतिक्रमणामुळे ऊसपीक, भात, नाचना, मका, वरणा, सोयबीन या पिकांची नासाडी केली जात आहे. त्यामुळे जंगलव्याप्त भागात राहणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे ऊन, वारा यांची तमा न बाळगता त्यांच्याशी दोन हात करताना त्यांच्या नाकीनऊ येते. रानमेवाच त्यांच्यासाठी मोठा आधार ठरत आहे. दोन महिन्यांत जेवढा रानमेवा विक्री करून पैसे मिळविता येतील, तेवढे मिळवून वर्षाची पोटगी केली जाते. त्याचबरोबर आर्थिक गणिते मांडली जातात. संपूर्ण कुटुंब पहाटे पाच वाजल्यांपासून सायंकाळी पाचवाजेपर्यंत रानमेवा गोळा करीत असते. शाहूवाडी तालुक्यात उदगिरी, शित्तूरवारूण, आळतूर, येळवण जुगाई, करंजफेण, आंबा परिसरात मोठ्या प्रमाणात धनगर बांधव वसले आहेत. जंगलातून मिळणाऱ्या वनौषधी वनस्पतींपासून ते जंगली रानमेवा विक्री करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. धनगर बांधव आपला जीव धोक्यात घालून आंबा, फणस, काजू, आदी माडावर चढायचे, काही मिळेल ते झोपडीत घेऊन यायचे आणि ५० ते ६० कि. मी. अंतरापर्यंत पायी चालत जाऊन बाजारपेठेत रानमेवा विक्री केला जातो. त्यातून मिळणाऱ्या चार पैशांतून संसाराला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली जाते.
रानमेवाच ठरतोय ‘त्यांच्या’ जगण्याचा आधार...
By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST