कोल्हापूर : शिक्षक संघाचे २२ जिल्हाध्यक्ष आपल्याकडे असल्याचा दावा राजाराम वरुटे करतात, मग त्यांनी राजीनामा का दिला? स्वत: संधी मिळेल तिथे खायचे आणि दुसऱ्याने भ्रष्टाचार केल्याचा डांगोरा पिटत स्वत: चारित्र्यवान असल्याची बनवेगिरी त्यांनी सुरू केली आहे. मी शिक्षक संघाचे पैसे खाल्ल्याचे वरुटेंनी सिद्ध करावे, करवीरनगरीत येऊन राज्यातील अडीच लाख शिक्षक देतील ती शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे उघड आव्हान प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी कोल्हापुरात आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिले. थोरात म्हणाले, कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यांची ओळख नसणाऱ्या वरुटेंना राज्याध्यक्ष केले. अध्यक्ष करण्यासाठी उंबरे झिजवताना एस. डी. पाटील चांगले होते, मग एकदम कसे वाईट झाले. प्रशासकीय बदल्या रद्दबाबत पुणे येथील चांगदेव मसूरकर यांनी याचिका दाखल केली असताना खोटे सांगून वरुटेंनी श्रेय लाटले. शिर्डी, रत्नागिरी, ओरोस येथील अधिवेशन शिक्षकांकडून पैसे घेऊन भरविले. नंतर पैसे गोळा झाल्यानंतर मी त्यांचे परत केले. तो रितसर खर्च दाखविला आहे. कोल्हापुरातील परिषदेवेळी वरुटे अध्यक्ष होते, यावेळी लाखो रुपये गोळा झाले त्याचे काय झाले? संघाचे सर्वच पदाधिकारी भ्रष्टाचारी आणि आपण तेवढे धुतल्या तांदळासारखे असल्याचा आव आणू नये. वरुटेंना मी राज्याचा अध्यक्ष केले. मला बॅँक काय करायची? संघाच्या निर्णयप्रक्रियेत कधीही ढवळाढवळ केली नाही. संघाचे थडगे बांधायचे आणि त्यावर उभे राहून आपली उंची मोजण्याचे काम वरुटेंनी केल्याचा आरोप प्रा. एस. डी. पाटील यांनी केला. अंशकालीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न मी सोडविला व त्याचे श्रेय वरुटेंनी घेतले. यापुढे त्यांचे पितळ उघडे पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस आप्पासाहेब कुल, कोषाध्यक्ष जनार्दन निऊंगरे, मोहन भोसले, एन. वाय. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आरोप सिद्ध करा, सांगाल ती शिक्षा भोगेन
By admin | Updated: August 31, 2014 00:29 IST