सावरवाडी : कोरोना आजाराबाबत न घाबरता योग्य तपासणी करणे गरजेचे आहे. वेळेत उपचार व सकस आहार घेतला की कोरोनावर मात करता येते, असे मत ॲस्टर आधार रुग्णालयाचे डॉ. अजय केणी यांनी व्यक्त केले.
शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील कै. जनाबाई पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त विश्वास पाटील फौंडेशनतर्फे आयोजित ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत घ्यावयाची काळजी’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. केणी विचार मांडत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषेदेचे सदस्य सुभाष सातपूते होते.
डॉ. केणी म्हणाले, कोरोनाकाळात जनतेने मास्क, सामाजिक अंतर, प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा टीबी, व इतर आजार आटोक्यात आले. कोरोना तपासणी करण्याकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याने योग्य वेळेत उपचार होऊ शकत नाही. भारताची १३८ कोटी जनता असून तळापर्यंत कोरोना लस पोहोचण्यास कालावधी लागणार असून, नागरिकांनी जागरूकता बाळगणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपूते, तुकाराम पाटील यांची भाषणे झाली. गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. शेवटी सुनील पाटील यांनी उपास्थितांचे आभार मानले. यावेळी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
( फोटो ओळ = शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील कै. जनाबाई पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. अजय केणी. शेजारी तुकाराम पाटील व सुभाष सातपूते उपस्थित होते.)