मुरगूड : भाकड, आजारी जनावरे कत्तलखान्याकडे नेणारी वाहने अडवून हिंदुत्ववादी संघटनेकडून जनावर विक्रेत्यांचा छळ सुरू आहे. याला कंटाळून महाराष्ट्र कर्नाटक अॅनिमल अँड मीट व्यापारी समन्वय समितीने जनावरांची खरेदी-विक्री, कत्तलखाने बंद केल्याने मुरगूडच्या बाजारात जनावरांची विक्री मंदावली आहे. ज्यांची जनावरे विकली गेली नाहीत, अशा संतप्त शेतकरी व व्यापाऱ्यांनी राज्य शासन व हिंदुत्ववादी संघटनेचा जाहीर निषेध केला. हिंदुत्ववादी संघटना व ‘पेटा’चे कार्यकर्ते जनावर व्यापाऱ्यांच्या जनावरांची वाहने अडवून खंडणी मागणे, वाहनचालक, व्यापाऱ्यांना मारहाण करणे, असे राजरोस प्रकार करत आहेत. शासन दरबारीही या व्यापारी, कत्तलखाना चालविणाऱ्यांना कोणतेच संरक्षण नाही. त्यामुळेच आज, मंगळवारी येथील जनावरांच्या बाजारात किरकोळ व्यवहार झाले. विक्रीस आणलेली जनावरे व्यापारी घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे परत घरीच न्यावी लागली. यामुळे संतप्त शेतकरी व व्यापाऱ्यांनी निषेध केला.कळे येथील शेतकरी संभाजी जाधव म्हणाले, भाकड व आजारी जनावरांचा शेतीसाठी आणि दुधासाठी वापर होत नाही. त्यामुळे ती कोणीच विकत घेत नाहीत. त्यामुळे ही जनावरे कत्तलखान्याकडेच द्यावी लागतात; पण आज आमच्या या जनावरांना कोणीच विकत घेतले नाही.यावेळी हाजी नियाज कुरेशी (फलटण), हाजी शब्बीर कुरेशी (बारामती), अनिल ऐवढे (सांगली), हाजी इरफाण बेपारी (मिरज), हुसेन बेपारी (माधवनगर), मारुती कांबळे (सावर्डे), खुदबुद्दीन बेपारी (कोल्हापूर), हनिफ बेपारी (बेळगाव) यांनी निषेध केला. मुरगूड बाजारात सरदार देशमुख (शिरोली दुमाला), राजेंद्र सोनुले (मुरगूड), रामा शिंदे (म्हाळुंगे), अशोक चांदणे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)पांजरपोळ संस्थेची चौकशी करावीवडगाव (जि. कोल्हापूर) व पुणे या ठिकाणांहून हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी २१ हजार जनावरे जप्त केली. त्यांना पांजरपोळमध्ये ठेवले. कोर्टाच्या आदेशानंतर सदर व्यापारी या जनावरांना पुन्हा आणण्यासाठी पांजरपोळ या संस्थेत गेले असता तेथे ही जनावरे नव्हतीच, शिवाय अद्याप ती परत मिळाली नाहीत. त्यामुळे जनावरे गायब होण्याच्या याप्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली.
हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध
By admin | Updated: January 21, 2015 23:54 IST