सोन्याच्या दागिन्यांसाठी संतोष परीट याने शुक्रवारी (दि. ५ फेब्रुवारी) पाचगाव येथून शांताबाई शामराव आगळे-गुरव (७०, रा. जगतापनगर, पाचगाव) यांना टाकाळा येथे नेऊन त्यांचा खून केला, त्याची त्याने पोलिसांकडे कबुलीही दिली; पण मृतदेहाचे तुकडे केल्याबाबत त्याने मौन बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासकामाबाबत तो पोलिसांना सहकार्य करत नाही.
शनिवारीही त्याला पुन्हा टाकाळा येथील अपार्टमेंटमध्ये चौकशीसाठी फिरवले. अपार्टमेंटच्या सभोवती सीसीटीव्ही कॅमेरे असले तरीही पश्चिमेकडील बाजूस हिरवळीवरील झाडाजवळ संशयिताला वारंवार नेऊन पोलीस चौकशी करत आहेत. तेथे पंचनामाही केला. मृतदेहाचे तुकडे केल्याचा पोलिसांचा संशय आहे; पण त्याबाबत संशयित माहिती देण्यास तयार नाही, त्यामुळे पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याद्वारे खुनाचा सविस्तर उलगडा करण्याची तयारी केली आहे.