कोल्हापूर : जयंती नाल्यातून गेले आठवडाभर मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. नदीप्रदूषणाची मात्रा वाढत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाला प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने आज, बुधवारी जयंती नाल्याचा पंचनामा करण्यास भाग पाडले. नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याचा पंचनामा करून महापालिकेला मंडळाने नोटीस बजावली. यानंतर जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने पाणी रोखण्यासाठी चोवीस तासांची मुदत मागितली. उद्या, गुरुवारपासून दूषित पाणी सोडण्याचे बंद करू, असे महापालिकेने लेखी कळविल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात महापालिकेला अपयश आले. यातच गेले आठवडाभर जयंती नाल्यातून दूषित पाणी सोडण्यात येत आहे. पंचगंगा प्रदूषणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने जयंती नाल्यातील पाणी महापालिकेने न थांबविल्यास याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचे ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी प्रदूषण मंडळास कळविले. यानंतर मंडळाच्या अधिकारी मनीषा होळकर जयंती नाल्यातील दूषित पाण्याचे नमुने घेतले. पाणी मिसळत असल्याचा पंचनामा करून महापालिकेला नोटीस बजावली. चोवीस तासांत नाल्यावर बरगे घालून पाण्याचा उपसा सुरू करीत असल्याचे आश्वासन महापालिकेने मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. (प्रतिनिधी) नागरिकांचे आरोग्य धोक्यातशहरासह इचलकरंजीपर्यंतच्या नदीपट्ट्यात साथीचे आजार वाढले, काविळीचे रुग्ण वाढले की पंचगंगेतील पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. पाण्याचे नमुने घेऊन पंचनामे केले जातात. कागदोपत्री कारवाई होते. नदी वॉशआउट करण्याची वल्गना होते. प्रदूषण कमी करण्याचा फार्स झाला की पुन्हा मात्र प्रश्न तेथेच राहतो. महानगरपालिकेच्या मुर्दाडपणामुळे नदीकाठच्या गावांना साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
२महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कितीही कारवाई केली, उच्च न्यायालयाने कितीही फटकारले, तरी पंचगंगेत दूषित पाणी सोडण्याच्या प्रकारात काहीही फरक पडलेला नाही. कोल्हापूर महानगरपालिक ा हद्दीत दररोज निर्माण होणारे १०० ते ११० दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी आजही अंशत: प्रक्रि या करून किंवा जसे आहे तसे थेट नदीत सोडले जात आहे. जयंती नाला, दुधाळी नाला या दोन मुख्य नाल्यांसह शहरातील छोट्या १२ नाल्यांतील सांडपाणी नदीत मिसळते आहे. जयंती नाल्यातून गेले आठवडाभर मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत जात आहे.
३कसबा बावडा येथील ७६ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दुधाळी नाल्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या कामास नुकतीच एजन्सी नेमली गेली आहे. बारा छोट्या नाल्यांचा ३१ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारच्या सुजल निर्मल योजनेकडून मंजूर केला गेला आहे. मात्र, या योजनेचे कामही संथ व निकृष्ट होत आहे.