कोल्हापूर : फटाक्यांची आतषबाजी करीत मोठ्या लवाजम्यासह थाटात रंकाळ्याचे ड्रेनेज पाईपलाईनचे उद्घाटन झाले. मात्र, चोवीस तासांतच ही पाईपलाईन ‘चोकअप’ झाल्याने मैलामिश्रित सांडपाणी पुन्हा रंकाळ्यात मिसळू लागले. तलावात मिसळणारे सांडपाणी वळविण्यासाठी टाकण्यात आलेल्या ९०० एमएम जाडीच्या जलवाहिनीत दगड व खरमाती अडकल्याने सांडपाणी पुढे सरकत नाही. आता त्यावर उपाययोजना शोधण्याचे काम उद्या, सोमवारपासून सुरू होणार आहे. माय असोसिएटस् या एजन्सीकडे बोट दाखवून महापालिका प्रशासन फक्त बघ्याच्या भूमिकेत आहे. रंकाळा परिसरातील दुर्गंधीत वाढच होत असल्याने परिसरातील नागरिकांतून संतापाची लाट पसरली आहे.रंकाळा तलावात शाम हौसिंग सोसायटी, परताळा व सरनाईक कॉलनी परिसरातील दररोज ११ ते १२ द.ल.घ.मी. सांडपाणी मिसळते. यापैकी शाम सोसायटी व परताळ्यातील ९ एमएलडी पाणी शुक्रवारी महापालिकेने दुधाळी नालामार्गे पंचगंगेकडे वळविले. फटाक्यांची आतषबाजी करीत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पाईपलाईनचे उद्घाटन केले. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या पाईपलाईनवर खर्च करण्यात आला.गेली साडेतीन वर्षे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. पहिल्या टप्प्यातच जुना वाशी नाका येथे अत्यंत टणक खडक लागल्याने त्याची खुदाई करण्यात प्रचंड वेळ गेला. ब्लास्टिंग करून खुदाई करावी लागली. हे काम पूर्ण झाले तोच जावळाचा गणपती ते तांबट कमान या मार्गावर पाईपलाईन टाकण्यात अडचणी निर्माण झाल्या. या मार्गावर येणाऱ्या ड्रेनेजलाईन, पाणीपुरवठा लाईन, टेलिफोन लाईन यामुळे काम अधिकच गुंतागुंतीचे बनले. त्यातून मार्ग काढत हे काम पूर्ण झाले. पाईपलाईनचे टेस्टिंग न घेताच उद्घाटनाची घाई केली गेली. नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये दगड, खरमाती अडकल्याचे दुर्लक्ष करण्यात आले. महापालिकेकडे अशी मोठ्या आकाराच्या पाईपलाईनमधील खरमाती काढण्यासाठी लागणारे जेट मशीन उपलब्ध नाही. त्यामुळे खासगी जेट मशीनची उपलब्धता केली जात आहे. या चेंबरमध्ये काही कर्मचाऱ्यांना आॅक्सिजन मास्क लावून खाली उतरवून अशी खरमाती काढण्याचा प्रयत्न उद्यापासून केला जाणार आहे. मात्र, हे सर्व काम एजन्सी कंपनीवर सोपवून महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे.
रंकाळ्याचे दुखणे वाढले
By admin | Updated: July 7, 2014 00:42 IST