कोल्हापूर : नवप्रयोग, संशोधन करणाऱ्या शिक्षकांना आर्थिक स्वरूपात प्रोत्साहन, मदत करण्यासाठी दरवर्षी नऊ लाख रुपये देणार आहे. त्याची तरतूद मला मिळालेल्या ग्लोबल अवॉर्डच्या साडेसात कोटी रुपयांतून केली आहे. शिक्षकांमधील सृजनशीलतेला वाव देण्यासाठी युनेस्कोच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
विविध विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी आम्ही ‘लेट क्रॉस द बॉर्डर’ उपक्रम राबवित आहोत. त्यामध्ये २०० शाळा सहभागी करण्याचे नियोजन आहे. सध्या जगभरातील १५० शाळा सहभागी झाल्या आहेत. त्यात दिल्ली, नागपूर, पुणे, सोलापूरमधील शाळा आहेत. कोल्हापूरमधील शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. नवीन शिक्षण पद्धतीबाबतचा अहवाल लवकरच सरकारला सादर केला जाईल. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसारख्या विविध संस्थांनी टीचर एक्सलन्स सेंटर, टीचर एक्सचेंज प्रोग्रॅम राबवावेत. ‘स्टार्टअप’चे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत. तंत्रज्ञानाची साधने जबाबदारी वापरण्याचे भान त्यांच्यामध्ये निर्माण करावे, असे आवाहन डिसले यांनी केले.
चौकट
डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करा
अभ्यासक्रम बदलणे गरजेचे आहे. शिक्षकांना वाटते की, आपण वर्गात मुलांना शिकवतो. मात्र, मुले ही नैसर्गिकपणे वर्गाबाहेर अनेक गोष्टी शिकत असतात. ते लक्षात घेऊन त्यांना शिक्षण द्यावे. त्यासाठी शिक्षकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा, असे डिसले यांनी सांगितले.