उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीने पोलिसांना चकवा देत पोबारा केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली. पोलिसांनी गाडीसह हत्यारे जप्त केली. पुणे-बंगलोर महामार्गावरील उजळाईवाडी येथे बुधवारी पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी कऱ्हाडकडून बंगलोरकडे जाणारी इनोवा कार (के ए -३५- ए ३१६८) पोलिसांनी अडवली. पोलीस गाडीतील व्यक्तींची चौकशी करीत असतानाच गाडीतील सहा दरोडेखोर क्षणात महामार्गालगतील शाळवाच्या शेतात पळाले. पोलिसांनी त्वरित त्यांचा पाठलाग केला. मात्र, दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी महालक्ष्मीनगरमार्गे गोकुळ शिरगाव हद्द व विमानतळ हद्दीतील तामगाव तलावापर्यंत दरोडेखोरांचा पाठलाग केला. पण, दरोडेखोरांनी पिकाच्या आडोशाने विमानतळाच्या दिशेने पोबारा केला. रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवून दरोडेखोरांचा शोध सुरू होता.
चौकट : दराेड्याची तयारी...
दरोडेखोरांच्या गाडीत दरोड्यासाठी लागणारी घातक हत्यारे व इतर साहित्य सापडले. यात दोन गावठी कट्टे, गॅस पाना, गॅस रेग्युलेटर, कटावरी, स्क्रू ड्रायव्हर, पकड, परफ्युम ,गॅस कटर, दोन मोठे मारतुल, एक्सो पाना, एक्सा ब्लेड, दोन गॅस निप्पल, ॲडजेस्ट पाना, लोखंडी पहार, पाच क्लिप्स, पेन ड्राईव्ह, गाडीचे किचन, पाच किलोची गॅस टाकी, लाल गॅस पाईप, जॅक टॉमी, टूलबॉक्स, सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल यांचा समावेश आहे. पोलिसांनी हे सर्व जप्त केले आहे.
क्षणात पलायन...
महामार्गावर पीएसआय सुरेश नलवडे, पोलीस नाईक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार राहुल देसाई, उदय शिंदे हे वाहनांची तपासणी करीत असतानाच दरोडेखोरांची गाडी आली. पोलिसांनी ती गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला घेण्यास सांगितली. आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकणार हे लक्षात आल्याने गाडीतील सहाही जणांनी काही कळण्याच्या आत दरवाजे उघडत पलायन केले.
फोटो २० उजळाईवाडी दरोडा१,२,
:१) दरोड्यांच्या तयारीत आलेल्या सहा दरोडेखोरांनी आपल्या चारचाकी गाडीतून आणलेले साहित्यांसह गाडी ताब्यात घेतली.
२ ) गाडीतून आणलेले साहित्य