कोल्हापूर : शहराच्या सर्व भागांत एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू असून येत्या दोन दिवसांत महापौरांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून असा एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त शिवशंकर म्हणाले की, कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी व काळम्मावाडी धरणांतील पाणीसाठा कमी होत आहे. शहरासाठी एकूण पाच टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून ते जुलै महिन्यापर्यंत पुरवायचे आहे. त्यामुळे आताच जर पाणीपुरवठ्याचे नियोजन केले नाही तर भविष्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणूनच खबरदारी घेण्याच्यादृष्टीने हे नियोजन करण्यात येत आहे. गुरुवारपासून हे नियोजन अंमलात आणण्याचा आमचा विचार आहे. तथापि, असा निर्णय घेण्यापूर्वी महापौरांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांच्याशी चर्चा केली जाईल. आज, मंगळवारी किंवा बुधवारी यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. शहरवासीयांनी आतापासून पाणी जपून वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले. दंडव्याजात सवलत नाहीयंदा घरफाळा, पाणीपट्टी, इस्टेट विभाग यांची वसुली कमी झाली आहे. पुढील आठ-दहा दिवसांत ती पूर्ण वसूल केली जाणार आहे. घरफाळ्याच्या दंडाच्या रकमेत पन्नास टक्के सवलत देण्याचा स्थायी समितीत झालेला सदस्य ठराव आपण अमान्य केला आहे. त्यामुळे दंडाच्या रकमेत सवलत मिळणार नाही. म्हणून नागरिकांनी घरफाळा वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शिवशंकर यांनी केले. सांगली महानगरपालिका प्रशासनाने सलग दोन वर्षे दंड व्याजात सवलत दिल्यामुळे लेखापरीक्षणात ताशेरे ओढले असून ते वसूल करावेत, असा शेरा मारण्यात आला आहे, तसेच कोल्हापूर बाबतीतही होऊ शकते, असेही आयुक्त म्हणाले. रोटेशन पद्धत वापरणारधरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने तो जुलै महिन्यापर्यंत तो पुरविण्याबाबत नियोजन करण्यासाठी महापालिकेला पाटबंधारे विभागाने नुकतेच पत्र पाठविले आहे. त्यादृष्टीने पाणीपुरवठा विभागाने पाणी सोडण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. आज एखाद्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे, तर त्या शेजारील भागात त्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर बंद असलेल्या भागाला दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करुन आदल्या दिवशी पाणीपुरवठा केलेल्या भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण शहरात एका ठिकाणी पाणी सुरू असेल तर शेजारील भागात पाणी बंद ठेवण्यासाठी रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या पद्धतीने सर्व भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.टँकरची संख्या वाढविणारपुढील आठवड्यापासून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याने त्यासाठी किमान आणखी ५ खासगी टँकर वाढविण्यात येणार आहेत. महापालिकेचे सात टँकर हे संपूर्ण शहरासाठी पाणी वितरण करण्यासाठी कमी पडत असल्याने ही खासगी टँकरची मदत घेण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार टँकरची संख्याही वाढविण्याचा विचार महापालिका करत आहे. गळती काढण्यावर भरएक दिवसआड पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनावेळी शहर व उपनगरांतील विशेषत: रिंगरोडवर असणाऱ्या जलवाहिनीची गळती काढण्यात येणार आहे. त्यामुळे गळतीद्वारे वाया जाणाऱ्या पाण्याचाही वापर करण्यात येईल पण गळती काढताना पाणी नियोजनावर त्याचा कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही, असे स्पष्ट आदेश पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महापालिकेचे मिशन ‘पाणी’
By admin | Updated: March 22, 2016 00:19 IST