चिपळूण (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील असुर्डे धरणात बुधवारी एका महिलेसह तिच्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मयुरी बाबाराम चौगुले (वय ३५), हर्ष बाबाराम चौगुले (११), शारदा बाबाराम चौगुले (१३, सर्व रा. असुर्डे) अशी मृतांची नावे आहेत.
मंगळवारी सकाळी ही घटना घडली; मात्र बुधवारी पहाटे तीन वाजता ही घटना उघडकीस आली. येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात बाबाराम हेरू चौगुले शिपाई म्हणून काम करतात. त्यांना पत्नी मयुरी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची पत्नी लाकडे गोळा करण्यासाठी आपल्या छोट्या दोन मुलांसह असुर्डे धरणाच्या काठावर गेल्या होत्या.
सायंकाळी बाबाराम चौगुले हे कामावरून घरी आल्यानंतर महाविद्यालयातून आलेल्या मुलींकडे पत्नी आणि छोट्या मुलांविषयी चौकशी केली असता ती लाकडे आणण्यासाठी गेली होती, असे त्यांनी सांगितले. मयुरी चौगुले यांच्या कुंभारखणी येथील माहेरी चौकशी केली. मात्र, त्यानंतर काही शेतकऱ्यांनी धरणाच्या काठावर त्या लाकडे तोडताना दिसल्याचे सांगितले. त्याप्रमाणे धरण परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी तेथे लाकडाची मोळी आणि मुलांचे कपडे दिसले. पहाटे तीन वाजता धरणाच्या पाण्यात या तिघांचे मृतदेह आढळले.