कोल्हापूर : खासगी रुग्णालयातील अतिगंभीर कोरोना रुग्ण अखेरच्या टप्प्यात सीपीआर आणि आयजीएम इचलकरंजी या शासकीय रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यामुळेच या दोन्ही रुग्णालयातील मृत्यूदर वाढल्याचे निरीक्षण विभागीय टास्क फोर्सच्या सदस्यांनी नोंदविले आहे.
टास्क फोर्समधील सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील नवले हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप कदम, बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभागाच्या प्राध्यापक डॉ. आरती किणेकर या तीन सदस्यांनी १२ मे रोजी सीपीआर, आयजीएमला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली होती नंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. त्यांच्या या पाहणीचा अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
१ जानेवारी ते ११ मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात १०७१ मृत्यू झाले असून मृत्यूदर ३.५ टक्के आहे. यातील ४५ टक्के मृत्यू हे सीपीआर, आयजीएम इचलकरंजी या दोन शासकीय रुग्णालयात झाले आहेत. त्याखालोखाल डी. वाय. पाटील हॉस्पिटल, उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज आणि ॲस्टर आधार येथे मृत्यू झाले आहेत, असे निरीक्षण टास्क फोर्सने नोंदवले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने खासगी रुग्णालयातील अतिगंभीर रूग्ण ऐनवेळी सीपीआर, आयजीएममध्ये दाखल करण्यात आल्याने त्यांच्यावर उपचार करणे कठीण झाले. त्यामुळे मृत्यूची संख्या वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
गृहअलगीकरणात सूचनांचे पालन नाही
कोविड काळजी केंद्र आणि गृहविलगीकरणातील ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ रुग्णांची वेळीच योग्य ती काळजी घेण्यात आलेली नाही आणि त्यांना योग्य त्यावेळी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलेले नाही. हे लक्षात येते. गृहविलगीकरणामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्याचे आढळून येत नाही.
चौकट
उपचारपद्धतीचे पालन, परंतु औषधांचा अडथळा
सीपीआर किंवा आयजीएममध्ये केंद्र सरकारने आखून दिलेल्या उपचारपद्धतीचे पालन होत आहे. आवश्यक औषधांचा साठाही योग्य प्रमाणात आढळून आला. मात्र, रेमडेसिविर आणि टॉसिलीझुमा औषधांच्या पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
सगळीकडेच अपुरे मनुष्यबळ
सर्वच रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता ही ज्वलंत प्रश्न असल्याचे आढळून आले. शासनाने मंजूर केलेल्या पदांपैकी जी पदे रिक्त आहेत ती पदे तातडीने भरणे आणि सद्य:स्थितीमध्ये वाढलेली रुग्णसंख्या व मृत्यू लक्षात घेऊन अधिक मनुष्यबळ इतर संस्थांमधून वळविण्यात यावे अशा नवीन मनुष्यबळ भरावे, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
चौकट
टास्क फोर्सने सुचविलेल्या अन्य उपाययोजना
१ जे रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेऊन निगेटिव्ह झाले आहेत. तथापि त्यांची रुग्णालयामध्येच ठेवून देखभाल करण्याची गरज आहे अशांसाठी नॉन कोविड आयसीयूची सुविधा निर्माण करावी.
२ प्रयोगशाळांची संख्या आणि चाचण्या वाढवाव्यात. पॉझिटिव्ह रुग्णांची सीसीसी किंवा गृहिििविलगीकरणामध्ये सोय करावी.
३ जिल्ह्यातील सध्याच्या विषाणूमध्ये म्युटेशन झाले का याची चाचणी करावी.
४ प्रत्येक रूग्णालयाने नियमितपणे डेथ ऑडिट करून त्यावर उपाययोजना करावी.
५ सर्व डॉक्टर, नर्सेसचे कोव्हिड उपचाराबाबत प्रशिक्षण करावे
६ ऑक्सिजनचा योग्य तो वापर करणे आणि ऑक्सिजन ऑडिटची प्रक्रिया सातत्याने राबविण्याची प्रक्रिया सर्व रुग्णालयांना बंधनकारक करावी.
७ म्युकर मायकोसिसवरील उपचाराबाबत योग्य ती उपाययोजना करण्याकरिता प्रशिक्षण व ओषधोपचार उपलब्ध करून देण्याची गरज आहे.