प्रवीण देसाई - कोल्हापूर --विधानसभा निवडणुकीत राज्यात ‘मनसे’ला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नाही. पक्षाला आता एका नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या गळतीचा असून निवडणुकीच्या पूर्वीपासून लागलेली ही गळती अद्यापही थांबलेली नाही. नुकतेच एका जिल्हाध्यक्षांनी ‘जय महाराष्ट्र’ करून पक्षाला जिल्ह्यात हादरा दिला आहे. येणाऱ्या काळातही आणखी हादरे बसण्याची शक्यता आहे.पदाधिकाऱ्यांच्या वादाबरोबरच इतर विविध कारणांनी ‘मनसे’ नेहमीच चर्चेत राहिली आहे. सुरुवातीपासूनच पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. त्यामध्ये शहरात एकाचवेळी तीन-तीन शहराध्यक्षांची नेमणूक झाली होती. त्यामुळे प्रत्येकाचे गट आणि तट यामध्ये पक्षाची विभागणी होऊन ही गटबाजी अधिकच तीव्र झाली होती परंतु यामध्ये हस्तक्षेप करून ती मिटविण्याचा साधा प्रयत्न ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून झाला नाही. तत्कालिन जिल्हा संपर्कप्रमुखांनी तर याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. अलीकडच्या काळात यशवंत किल्लेदार या युवा संपर्कप्रमुखाने सूत्रे स्वीकारल्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली. काही काळ सुरळीतपणे काम सुरू होते पण आता त्यांनी नेमलेले पदाधिकारीसुद्धा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत आहेत. एक-एक करत ही संख्या आता वाढत आहे.निवडणुकीपूर्वी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. परंतु आता निवडणुुकीनंतरही प्रमुख पदाधिकारी पदाचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षाला रामराम करताना दिसत आहेत. निवडणुकीपूर्वीपासून लागलेली ही गळती थांबण्याऐवजी ती अधिकच वाढत चालली असल्याचे चित्र आहे. लवकरच काही प्रमुख पदाधिकारी पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर पक्षनेतृत्वाचे दुर्लक्ष आणि निवडणुकांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ तसेच स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या ‘सोयीच्या भूमिके’मुळे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते हे नाराज आहेत. ते जरी पक्षातून बाहेर पडले नसले तरी ते पक्षाच्या कामासाठीही अद्याप बाहेर पडले नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर फेरबदल करून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून जरी देण्यात आले असले तरी सध्याचे वातावरण पाहता ते अडचणीचे ठरणार आहे.विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’ने जिल्ह्यातील दहापैकी नऊ जागांवर उमेदवार उभे केले होते. परंतु सर्वच ठिकाणी अनामत रक्कम जप्त झाली. हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मते पडल्याने इतके दिवस आंदोलने करून व संघटनात्मक काम करून बांधलेली कार्यकर्त्यांची मोट गेली कुठं. काही ठिकाणी तर पक्षाच्या उमेदवारांना कार्यकर्तेही मिळाले नाहीत. काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी भूमिका घेत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना रसद देण्याचे काम केले. यामध्ये ‘अर्थ’पूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा आहे. याबाबत लेखी स्वरुपात त्याचबरोबर अन्य माध्यमांतून पक्षनेतृत्वाकडे तक्रारी गेल्या आहेत. जिल्ह्यात ‘मनसे’ला गळती वगैरे काहीही लागलेली नाही, तर पक्ष सोडून जाणाऱ्यांची कारणे वेगळी आहेत. त्याचे स्पष्टीकरण आपण कोल्हापुरात आल्यावर देऊ.- यशवंत किल्लेदार, संपर्क जिल्हाध्यक्ष, मनसे.यांनी केला जय महाराष्ट्र...मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील, उदय पोवार, व माजी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गिरी यांनी राजीनामा दिला.
जिल्ह्यात ‘मनसे’च्या रेल्वेला लागली गळती
By admin | Updated: November 21, 2014 00:34 IST