मलकापूर : मलकापूर शहरातील शाळी नदीच्या पाण्याचे प्रदूषण झाले असून, पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्याचे आव्हान सत्ताधारी जनसुराज्य व भाजप आघाडीसमोर आहे.शहराची लोकसंख्या ५ हजार ५५५ इतकी आहे. मलकापूर हे विशाळगड जहागिरीची राजधानी होती. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी खास बाब म्हणून मलकापूरला नगरपरिषद स्थापन केली. शाळी व कडवी या दोन नद्यांच्या तीरावर मलकापूर शहर वसले आहे. या दोन्ही नद्यांमुळे शहराची वाढ होत नाही. शहराच्या उजव्या बाजूने शाळी नदी वाहत आहे. आॅक्टोबरमध्ये मलकापूर शहराजवळ असणाऱ्या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते; पण पालेश्वर धरणातून पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर शाळी नदीचे पाणी वाहण्याचे बंद होते. शाळी नदीवर नगरपरिषदेची पाण्याची योजना आहे. या योजनेसाठी नगरपरिषदेने लाखो रुपये दिले आहेत. प्रदूषित पाण्यामुळे ही पाणी योजना बंद ठेवण्यात आली आहे, तर शहरातील गटाराचे पाणी, शौचालयांचे पाणी शाळी नदीत मिसळत आहे. जनावरेदेखील या नदीत धुतली जातात. धरणातून पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे नदीच्या पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला असून, पाणी दूषित झाले आहे. पाण्याला उग्र वास सुटल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. दरवर्षी या नदीचे पाणी दूषित होत असते. या दूषित पाण्यामुळे शाळी नदीवरील पाणी योजना पालिकेला बंद ठेवून कडवी नदीवरील पाणी योजनेवर शहराला पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळते. या नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सत्ताधारी जनसुराज्य व भाजप महाआघाडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)प्रक्रिया : यंत्रणा हवीशहरातील गटारे, शौचालयांच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा पालिकेने उभी करावी व शाळी नदीचे पाण्याचे प्रदूषण रोखावे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येला पाण्याची समस्या जाणवणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींकडून शासन दरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शाळी नदीचे दूषित झालेले पाणी स्वच्छ करण्यासाठी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करणार आहे. -अमोल केसरकर, नगराध्यक्ष
मलकापुरात ‘शाळी’च्या पाण्यास दुर्गंधी
By admin | Updated: January 20, 2017 23:54 IST