सदाशिव मोरे। आजरा
आजरा तालुक्यात हत्ती, गवे व जंगली जनावरांचा उपद्रप वाढला आहे. गेल्या ७ वर्षात जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची ४ कोटी ४१ लाख ९६ हजारांची भरपाई शेतकऱ्यांना वनविभागाने दिली आहे. भरपाईच्या रकमेपेक्षा नुकसानीची रक्कम अधिक आहे. जंगली जनावरांच्या भीतीने बहुतांशी शेतकऱ्यांनी जंगलाशेजारील शेती करणे बंद केले आहे.
आजरा तालुक्यात २००६ पासून हत्तींचे आगमन झाले आहे. हत्तींचे वास्तव्य मसोली, हाळोली, घाटकरवाडी व सुळेरान परिसरात आहे. शेतकरी राजा प्रत्येक वर्षी मशागत करून शेती करतो. मात्र, हत्ती व गव्यांसह जंगली जनावरांकडून पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणात केली जाते. दिवसा जंगलात व रात्री शेतकऱ्यांच्या पिकावर डल्ला मारण्याचे काम जंगली जनावरांकडून सुरूच आहे. हत्ती गव्यांच्या भीतीने शेतकऱ्यांनी शेतातील राखणेही बंद केले आहे.
वनविभागाचे कर्मचारी गेली बारा-तेरा वर्षे दिवसा नुकसानीचे पंचनामे तर रात्री हत्तीला हुसकावून लावण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आधुनिक साधने नाहीत. फक्त सूर बाणाने हत्तीला हुसकावून लावले जात आहे. सध्या जंगल क्षेत्रात हत्ती व गव्यांना त्यांचे खाद्य कमी झाले आहे. त्यामुळे त्यांचा अधिवास खाजगी मालकीतील जमिनीमध्ये होताना दिसून येतो. जंगलांमध्ये वनतळी व जंगली जनावरांसाठी खाद्य उपलब्ध करणे गरजेचे आहे. पिकांच्या नुकसानीबरोबर जंगलातील प्राणी जंगल क्षेत्रातच राहण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.
चौकट: ..नुकसानीची वर्षनिहाय दिलेली भरपाई रक्कम
२०१४-१५ - १९ लाख १६ हजार
२०१५-१६ - ४१ लाख ६२ हजार
२०१६-१७ - ५४ लाख ८० हजार
२०१७-१८ - ७४ लाख ७३ हजार
२०१८-१९ -६९ लाख ०८ हजार २०१९ -२० - ८८ लाख ७१ हजार
२०२०-२१ - ९३ लाख ४३ हजार.
मार्च ते जुलै २०२१ - ९४ लाख १५ हजार
-
-- हत्ती संगोपन केंद्राची गरज
घाटकरवाडी परिसरात हत्ती संगोपन केंद्र सुरू करण्याबाबत वनविभागाच्या हालचाली सुरू आहेत. पण, या परिसरातील ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे. मात्र हत्ती संगोपन केंद्र सुरु झाल्यास पर्यटनाला चालना मिळून रोजगारामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वनविभागाने घाटकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन माहिती देणे गरजेचे आहे.
चौकट :
...पिकांचे होणारे नुकसान
टस्कर हत्तीसह गव्यांकडून ऊस, केळी, नारळ, काजू, मेसकाठी, फणस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर शेती अवजारे व पाईपलाईन पाण्याच्या टाक्या फोडल्या जात आहेत. हत्ती, गव्यांकडून होणारे नुकसान लाखात असले तरी भरपाई मात्र हजार रूपयात मिळत आहे.