रवींद्र येसादे
उत्तूर : गेल्या २१ वर्षांपासून रखडलेला आजरा तालुक्यातील बहुचर्चित आंबेओहोळ प्रकल्पाच्या विस्थापितांचा प्रलंबित असणारा प्रश्न १० दिवसांत निकालात काढा, असा आदेश मंत्रिमहोदयांनी दिला असला तरी शासकीय अधिकाऱ्यांकडून पुनर्वसन प्रगतिपथावर, शासनाकडून मार्गदर्शन मागवले, अशी नेहमीची उत्तरे आढावा बैठकीत दिल्याने प्रश्न सुटणे कठीणच असल्याचे विस्थापितांतून बोलले जात आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी १०३ धरणग्रस्तांना जमीन, २१२ धरणग्रस्तांना पॅकेजचे वाटप केले. १०८ धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही; मात्र ते प्रगतिपथावर आहे. या सर्वांना तीन वेळा नोटिसा दिल्या आहेत. १७.२ हेक्टर जमीनवाटप शिल्लक आहे. प्राप्त अनुदान १२ कोटी शिल्लक असून धरणग्रस्त पॅकेज घेऊ शकतात, अशी माहिती दिली.
आढावा बैठकीत धरणग्रस्त पोटतिडकीने प्रश्न मांडत होते. अधिकारी मात्र प्रगतिपथावर, शासनाकडून मार्गदर्शन, न्यायप्रविष्ट बाब अशी कारणे देत होते. धरणग्रस्त संकलन दुरुस्तीची मागणी करीत होते. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. धरणग्रस्तांनी नाकारलेल्या जमिनी दाखविण्याचा घाट पुन:पुन्हा घातला जातो. क्रमांक १ ची ‘जमीन दाखवा’ ही धरणग्रस्तांची बाजू तितकीच महत्त्वाची आहे.
संपादित नकाशे दुरुस्त करून मिळावेत. मूळ मालक उच्च न्यायालयात गेले आहेत. जमिनींचा ताबा मिळणेही दुरापास्त झाले आहे. पॅकेज मागणीसाठी धरणग्रस्तांवर दबाव टाकला जातो, असेही धरणग्रस्तांचे म्हणणे आहे.
जमिनीचा ताबा रीतसर मिळाला असतानाही कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील शेतकऱ्यांच्या व धरणग्रस्तांच्या पिकांवर रोटर फिरविला. असे अनेक प्रकार धरणग्रस्तांबाबतीत घडत आहेत. २००६ नंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी खातेफोड करून घेतली आहे. त्यामुळे जमिनी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. खातेफोड का केली असा सवाल धरणग्रस्तांनी केला. मंत्रिमहोदयांनी चौकशी लावा, असे सांगितले. करपेवाडीच्या जगद्गुरू शंकराचार्य पीठाचा विषय संपला, असे सांगण्यात आले होते. मात्र हा प्रश्न सुटला नसल्याचे जगद्गुरू पीठाचे म्हणणे आहे. त्यामुळे करपेवाडीकरांचे पुनर्वसन जटील बनले आहे.
------------------------
* दृष्टिक्षेपात पूर्ण कामे
धरणाचे ८० टक्के मातकाम पूर्ण, सांडवा, पुच्छ कालवा ८५ टक्के पूर्ण, सांडवा संधानकाचे काम ८० टक्के पूर्ण, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ७, कडगाव १४१ भूखंड तयार.
-------------------------
* अपूर्ण कामे
घळभरणी, ०.५० सिंचन तथा विद्युत विमोचक, सांडवा, पुच्छ काम १५ टक्के, सांडवा संधानकाचे काम २० टक्के, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे पूर्ण झाले असे असले तरी कामास सुरुवात नाही. गावठाण भूखंडाचे वाटप झालेले नाही.
------------------
* प्रस्तावित कामे - घळभरणी २.५१ ल.क्ष.घ.मी. मातकाम असून १९५३.८० लक्ष निधीची आवश्यकता आहे. ऊर्ध्व बाजूचे ७५००० चौ. फू. अश्मपटलांचे ३३७५० घ. मी. दगडकाम, सांडव्याचे १२५० घ. मी. काम, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची कामे १०० टक्के पुर्नवसन करणे.
------------------------
* आवश्यक जमीन
सात गावांतून ३८९.५० हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता आहे. बुडीत क्षेत्रातील संपादनाचे १० प्रस्ताव आहेत. नऊ निवाडे होवून ३८९.५० इतक्या क्षेत्राचे वाटप झाले आहे. एका प्रकरणाची १०.०७ इतकी जमीन संपादित प्रक्रिया सुरू आहे.
-------------------------
* आरोप-प्रत्यारोप
गेली २१ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाबाबत राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. पुनर्वसनाबरोबरच कामही होणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोणी किती मदत केली याचा श्रेयवाद सुरू झाला आहे. या श्रेयवादात धरणग्रस्त भरडला जात आहे.
-------------------------
* आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे शुक्रवारी आढावा बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व अधिकाऱ्यांसमोर धरणग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. दुसऱ्या छायाचित्रात रखडलेले घळभरणीचे काम.
क्रमांक : १३१२२०२०-गड-०१/०४