कळंबा : उपनगरांसह लगतच्या ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या कळंबा तलावाच्या हद्दीतील अंदाजे वीस एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असून महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाने दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. परिणामी, भविष्यात तलावाच्या अस्तित्वावर बाधा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कळंबा तलाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्वी महापालिकेस हस्तांतरित केला तरी त्याचा सातबारा मालकी हक्क पालिकेकडे नसल्याचे तलावाच्या पूर्वभागातील हद्दीत अतिक्रमणे होत असल्याचे तत्कालिन नगरसेवक मधुकर रामाणे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
२०१४ साली तत्कालीन नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक मधुकर रामाणे यांनी ही गंभीर बाब तत्कालीन आयुक्त पी. रवीशंकर व जलअभियंता मनीष पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने एक लाख सत्तेचाळीस हजार मोजणी फी भरून शासकीय मोजणी करत तलावाचा मालकी हक्क सातबारा पालिकेच्या नावे केला होता.
त्यावेळी अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढत तलावाची सीमा निश्चित करून सिमेंटचे खांब उभारण्यात आले. मात्र, काही दिवसांतच हे खांब उखडून पुन्हा शेतीसाठी अतिक्रमणे करण्यात आली होती. त्यावेळी जुजबी कारवाई करण्यासाठी लेखी नोटिसा धाडल्या, पण संरक्षक भिंत उभा करणे, कायदेशीर कारवाई करणे याचा प्रशासनास विसर पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुलेआम अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. तलाव हद्दीतील अतिक्रमण केलेल्या जमिनीवर आज रासायनिक खते वापरून विविध पिके घेतली जात आहेत. त्यामुळे रसायनयुक्त पाणी तलावात मिसळून जैवविविधतेवर मोठा परिणाम होत आहे.
दिवसेंदिवस वाढत्या अतिक्रमणांचा तलावाच्या अस्तिवास धोका असल्याने महापालिका प्रशासनाने तत्काळ कायदेशीर कारवाई करून तलावाची हद्द निश्चित करणारी संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी होत आहे.
अतिक्रमणाची स्पर्धा : २०११ साली अस्तित्वात असणाऱ्या कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाच्या आशीर्वादाने तलावाच्या पाणलोट क्षेत्रात शासकीय नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गुंठेवारी करण्यात आली. बेकायदेशीर बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. आजही ग्रामपंचायत प्रशासनाकडून अभय मिळत असल्याने पाणलोट क्षेत्रात अवैध बांधकामे पूर्णत्वास जात आहेत. आता तलावाच्या हद्दीत अतिक्रमण झाली. इतकेच काय तलावाचे मुख्य जलस्रोत असणाऱ्या कात्यायनीलगत कसायला दिलेल्या जमिनीत बेकायदेशीर प्लॉट पाडून बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली आहेत.
फोटो ०७ कळंबा तलाव
ओळ
तलावाची हद्द दर्शविण्यासाठी २०१४ मध्ये रोवण्यात आलेले खांब व अतिक्रमण करत सुरू असणारी बेकायदेशीर शेती