कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस दूध खरेदी दरात दीड व विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गायीच्या विक्री दरात पंधरा दिवसांपूर्वीच वाढ झाल्याने केवळ खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ केली जाणार आहे. नवीन दरवाढीची अंमलबजावणी बुधवार, दि. ११ पासून होणार असून कोल्हापुरात म्हशीचे दूध ४६, तर मुंबईत ५० रुपये लिटरने ग्राहकांना घ्यावे लागणार आहे. स्पर्धक दूध संघांनी दुधाच्या दरात वाढ केल्याने ‘गोकुळ’ने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. गायीच्या विक्री दरात पंधरा दिवसांपूर्वी वाढ केली आहे. त्यामुळे आता त्यामध्ये वाढ न करता गायीच्या खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांत ‘गोकुळ’ने दूध खरेदी व विक्री दरात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. (प्रतिनिधी)
‘गोकुळ’ची दोन रुपये विक्रीत वाढ
By admin | Updated: June 8, 2014 01:14 IST