कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना संचालकपदाची लॉटरीच लागली. विधानसभेतील पराभवानंतर त्यांचे काहीसे पुनर्वसन झाले व पुन्हा विधानसभेसाठी ताकद ही मिळाली. विरोधी आघाडीतून ते सहजरीत्या विजयी झाले. त्यांच्या विजयाने विरोधी आघाडीच्या विजयाची घाेडदौड सुरु झाली.
मिणचेकर यांना १९६५ तर विद्यमान संचालक विलास कांबळे १६१३ मते मिळाली. मिणचेकर हे ३५२ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयासाठी महत्त्वाचे दोन-घटक कारणीभूत ठरले. ते शिवसेनेचे माजी आमदार असल्याने दोन्ही आघाड्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे दोन्हीकडून त्यांना मदत झाली. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर व आमदार विनय कोरे यांनी आग्रह धरल्यामुळे त्यांना विरोधी आघाडीची उमेदवारी मिळाली. सत्तारुढ आघाडीचे उमेदवार विलास कांबळे यांची स्वत:ची राजकीय ताकद नाही. सत्तारुढ आघाडीच्या बळावर ते गेल्या निवडणुकीत विजयी झाले होते. ते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते परंतु विरोधी आघाडीतून उमेदवारी मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी सत्तारुढ गटाला पाठिंबा देऊन उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे तशी ही लढत एकतर्फीच झाली. डॉ. मिणचेकर आता दूध संघाचे संचालक झाले असले तरी पुन्हा विधानसभा हेच त्यांचे मुख्य टार्गेट आहे.