राजीव मुळ्ये - सातारा -मुलांनी जबाबदारी नाकारलेल्या म्हाताऱ्यांनी दु:खं शेअर करण्याचं ठिकाण म्हणजे वृद्धाश्रम, या संकल्पनेला साताऱ्याच्या माजी नगराध्यक्षांच्या डॉक्टरपुत्राने जबरदस्त छेद दिलाय. वयाच्या ऐंशीव्या वर्षी ज्ञानपिपासू वृत्ती कायम ठेवून संगणक, पुस्तकांचा ढिगारा आणि जुन्या टिपणांच्या माध्यमातून इतिहासात रमून कलियुगातला आधुनिक वानप्रस्थाश्रम किती समाधानाचा असू शकतो, याचा आदर्श त्यांनी उभा केलाय. डॉ. सदानंद कोल्हटकरांची भेट ‘आनंदाश्रम’ वृद्धाश्रमात होईल अशी अपेक्षा सातारकर करूच शकत नाहीत. त्यांचे वडील डॉ. पांडुरंग कोल्हटकर १९६० मध्ये सातारचे नगराध्यक्ष होते. डॉ. सदानंद स्वत: जर्मनीहून शिकून आलेले. त्याकाळी परदेशात बोटीनं जावं लागे. १९५५ साली फार्मसीची डिग्री घेऊन १९६० मध्ये ते जीएफएएम झाले. तेव्हापासून १९९५ पर्यंत वडिलांचा दवाखाना चालविला. ‘ट्रॉपिकल मेडिसिन’चा डिप्लोमा घेण्यासाठी १९६७ ला ते जर्मनीला गेले. संसर्गजन्य आजारांवर संशोधन केलं. ब्रिटिश आमदनीत सध्याच्या सैनिक स्कूलच्या जागी जर्मन कैद्यांच्या बराकी होत्या. १९३९ ते १९४५ या काळात हर्बर्ट फिशर या हिटलरविरोधी जर्मन व्यक्तीला तिथं स्थानबद्ध केलं होतं. त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याची जबाबदारी डॉ. पांडुरंग कोल्हटकर यांच्यावर होती. त्यांच्याबरोबर सदानंदही कधीकधी जात असत. पुढे १९७० च्या आसपास हर्बर्ट पूर्व जर्मनीचे भारतातील राजदूत बनून साताऱ्यात आले, तेव्हा त्यांनी सैनिक स्कूलला भेट दिली. त्यांच्या जर्मन भाषणाचा इंग्रजी अनुवाद डॉ. सदानंद यांनी केला होता. त्यानंतर पूर्व जर्मनीतील जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी त्यांची निवड झाली आणि १९७३ मध्ये ते पुन्हा जर्मनीला गेले. उतारवयात ते पुण्याला स्थायिक होते.डॉ. सदानंद यांच्या पत्नी उषा १९९३ मध्ये निवर्तल्या. दोन्ही मुलं परदेशात गेली. पण ‘जनरेशन गॅप असतेच,’ अशा एखाद्या ओझरत्या उद्गाराव्यतिरिक्त त्यांच्या तोंडून चकार शब्द निघत नाही. ‘कोथरूडचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर. मला गुडघेदुखीचा त्रास. हार्टवरही प्रेशर येतं. तिथं कोण बघणार? सातारा माझी कर्मभूमी. सगळे मित्र इकडेच. म्हणून आलो,’ असं ते सांगतात. डॉ. विश्वास दांडेकर यांच्याकडील माहिती आणि पुस्तकांच्या खजिन्याची त्यांना भुरळ पडते. आनंदाश्रमात त्यांनी दुचाकी आणि चारचाकीही आणलीय. दुचाकीवरून या वयात ते शहरभर फिरतात. मित्रांना भेटतात. ‘डॉ. गजाभाऊ कुलकर्णी माझे क्लासमेट. डॉ. दिलीप येळगावकर माझे विद्यार्थी,’ असं सांगताना आठवणीत रमतात. इंदिरा काँग्रेसचे साताऱ्यातील संस्थापकइंदिरा गांधी राजकारणात एकट्या पडल्या असताना, अमेरिकेला आव्हान देणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना संपविण्याचा हा सीआयएचा डाव आहे, या संशयामुळं डॉ. सदानंद कोल्हटकर इंदिरा गांधींच्या बाजूने राहिले. १९७५ मध्ये त्यांनी इंदिरा काँग्रेसची साताऱ्यात स्थापना केली आणि १९८० पर्यंत अध्यक्षही राहिले. दत्ताजी बर्गे, किसन पाटील, प्रेमलाकाकी चव्हाण, वसंतराव फाळके, रफिक बागवान हे त्यांचे सहकारी. २ फेब्रुवारी ७८ आणि १५ आॅक्टोबर ७९ या दिवशी विरोध, अडचणी झुगारून इंदिरा गांधींच्या सभा साताऱ्यात घेतल्या. विरोधात असलेले यशवंतराव चव्हाण निवडून आले तेव्हा ट्रकभर माणसांचा मोर्चा घरावर आला होता, ही आठवण ते सांगतात.भाषणं, समरगीतं मुखोद्गतहिटलरची भाषणं, ‘मार्च’च्या वेळी गायली गेलेली जर्मन गाणी डॉ. सदानंद यांच्या संगणकात आणि मेंदूतही ‘सेव्ह’ आहेत. अगदी मुखोद्गत! महायुद्धाच्या इतिहासातले सूक्ष्म बारकावे ते सांगू शकतात. हिटलरच्या सैन्यानं मॉस्कोला धडक दिली तेव्हा ‘जपान सैबेरियावर हल्ला करणार नाही, त्यामुळं तिथं सैन्य ठेवण्याची गरज नाही,’ हा संदेश सांकेतिक लिपीतून मॉस्कोला पोहोचविणाऱ्या अॅना क्लाउजन यांना डॉ. सदानंद प्रत्यक्ष भेटून आलेत. संदेशवहनाची ती सांकेतिक लिपीही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. (रशियानं सैबेरियातील सैन्य मॉस्को आघाडीवर आणल्यामुळेच हिटलरचा पाडाव आणि मॉस्कोचा बचाव झाला होता.)
माजी नगराध्यक्षांचा डॉक्टरपुत्र ‘आनंदा’त!
By admin | Updated: November 16, 2014 23:52 IST