कोल्हापूर : ऐतिहासिक, सामाजिक आणि स्वातंत्र्याच्या क्रांतीचा साक्षीदार असलेल्या बिंदू चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या अर्धपुतळ्यांना तब्बल ७० वर्षांनी नवा साज चढला आहे. काळ्या रंगातील या पुतळ्यांची जागा आता ब्रॉंझने घेतली आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम लोकवर्गणीतून झाले आहे. त्याचे लोकार्पण गुरुवारी सकाळी चौकात पुष्पहार घालून झाले. आता परिसर सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवंतपणी तयार केलेला भारतातील एकमेव पुतळा अशी बिंदू चौकातील पुतळ्याची ओळख आहे. ९ डिसेंबर १९५० मध्ये आंबेडकर आणि फुले या दोन महापुरुषांचे पुतळे चौकात बसवण्यात आले. तेव्हापासून बिंदू माधव कुलकर्णी यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील हाैतात्म्याचा साक्षीदार असलेला हा चाैक पुढे सामाजिक क्रांतीला कायमच प्रेरणा देत राहिला. कोल्हापुरातील एकमेव भुईकोट किल्ला अशी ओळख असलेल्या बिंदू चौकातील किल्ल्याचे अस्तित्व आजही बुरुज आणि तटबंदीच्या रूपाने शाबूत असून, ते या फुले व आंबेडकरांच्या पुतळ्यांचे खऱ्या अर्थाने संरक्षण करतात.
अलीकडे या पुतळ्यांची काहीशी दुरवस्था झाली. त्याच्या डागडुजीची मागणी होत होती. तटबंदीचीही पडझड होत आहे. यासाठी वारंवार प्रशासनाला सांगूनही दुर्लक्ष होत असल्याने लोकजनशक्ती पार्टीने याता पुढाकार घेत लोकवर्गणीतून काम करण्याचे निश्चित केले. पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या कामाला महापालिकेचे अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची साथ मिळाली. काळ्या पुतळ्याच्या ऐवजी ब्रॉंझच्या पुतळा बसविण्यात आला. त्याचे गुरुवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अंजना फाळके व स्वत: नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते झाले लोकार्पण झाले. आता चबुतरा रुंदीकरण, बुरुज व तटबंदीची डागडुजी, रंगरंगोटी ही कामे करून बिंदू चौकाचे सौंदर्य आणखी खुलवले जाणार आहे.
फोटो: २१०१२०२१-कोल-बिंदू चौक
फोटो ओळ : कोल्हापुरातील बिंदू चाैकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या अर्धपुतळ्यांच्या नूतनीकरण झालेल्या कामाचे लोकार्पण गुरुवारी अंजना फाळके, नेत्रदीप सरनोबत, बाळासाहेब भोसले, सुशीलकुमार कोल्हटकर, तकदीर कांबळे, संग्राम यादव, चंद्रकांत माने, विकी मल्होत्रा यांच्या उपस्थितीत झाले.
(छाया: नसीर अत्तार )