कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी गंजीमाळ येथे सशस्त्र युवकांनी दोन घरात घुसून परिसरातील वाहनांची मोडतोड केल्याप्रकरणी शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी आणखी पाच संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या सहा झाली आहे.
शनिवारी अटक केलेल्या संशयितांमध्ये सचिन आनंदराव कुरडे (वय ३९), अविनाश कृष्णात कुरडे (२९), शक्ती कृष्णात कुरडे (३१), अक्षय महादेव लोखंडे (२५), ओंकार विष्णू फडतरे (२३ सर्व रा, वारे वसाहत) यांचा समावेश आहे. तर शुक्रवारी वैभव शहाजी कुरडे याला अटक करण्यात आले होते.
गंजीमाळ परिसरात गुरुवारी (दि. ३१) दुपारी पूर्ववैमनस्यातून दोन घरांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सहाजण जखमी झाले होते. यावेळी युवकांनी वाहनांचीही मोडतोड करून नुकसान केले होते. मोडतोड करत दहशत माजवल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी वैभव कुरडे या संशयिताला शुक्रवारी अटक केली होती. त्याला ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.