कोल्हापूर : महाकाली तालीम भजनी मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रंकाळा तलाव येथे घेण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यतीत समडोळी (ता. मिरज) येथील जलगंगा बोट क्लबने प्रथम क्रमांक, तर सप्तर्षी बोट क्लब, कवठेपिरान (ता. मिरज) या संघाने द्वितीय स्थान पटकावले.आज, शनिवारी संध्यामठ घाट, रंकाळा तलाव येथे घेण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यतीत सप्तर्षी बोट क्लब, कवठेपिरान (ता. मिरज), जलगंगा बोट क्लब, समडोळी (ता. मिरज), अचानक बोट क्लब, समडोळी (ता. मिरज), कृष्णा बोट क्लब, कसबे डिग्रज (सांगली) या चार संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी संध्यामठ घाट-राजघाट-पद्माराजेघाट-तांबट कमान घाट असा संपूर्ण तलावाच्या परिसरात दोन फेऱ्या व तांबट कमान ते संध्यामठ घाट अशा तीन उभ्या फेऱ्या (अंदाजे आठ किलोमीटर) या होडी संघांना पार करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या फेऱ्यांमध्ये प्रथमपासून जलगंगा बोट क्लबने आघाडी घेतली. ही आघाडी संपूर्ण स्पर्धेत कायम ठेवत प्रथम क्रमांक मिळवला. तर त्यापाठोपाठ सप्तर्षी बोट क्लब, कवठेपिरान (ता. मिरज), अचानक बोट क्लब, समडोळी (ता. मिरज) या संघांचा क्रम लागला; तर कृष्णा बोट क्लबने शेवटच्या फेरीत राजघाट येथेच थांबणे पसंत केले. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे, सुरेश साळोखे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामभाऊ चव्हाण, नगरसेवक परिक्षित पन्हाळकर, इंद्रजित बोंद्रे, माजी नगरसेवक अजित राऊत, माजी उपमहापौर विक्रम जरग, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, मंडळाचे अध्यक्ष विकास साळोखे, भानुदास इंगवले, गिरीश भोसले, संजय नलवडे, सनवीर भोसले, आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच दत्ता पाटील, दीपक पाटील, सागर फडतारे, मदन साठे, विकास साळोखे यांनी स्पर्धेसाठी पंचगिरी केली. (प्रतिनिधी)
होड्यांच्या शर्यतीत ‘जलगंगा’ प्रथम
By admin | Updated: September 7, 2014 00:44 IST