हातकणंगले-जयसिंगपूर रस्त्याच्या उत्तरेला मजले-तमदलगे डोंगर असून वनविभागाने या डोंगरावर मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहेत. झाडे मोठी झाली असून या जंगलामध्ये ससे, मोर, सर्प, सरडे, मुंग्यांची वारुळे, प्राण्याची अंडी मोठ्या प्रमाणात आहेत. मंगळवारी (दि. १) रात्री १० वाजता अचानक या डोंगराच्या माथ्यावर अज्ञात माथेफिरूने आग लावल्यामुळे डोंगरावरील लहान-मोठी झाडे जळून खाक झाली; तर झाडाच्या बियांचे मोठे नुकसान झाले.
बुधवारी दुपारी या डोंगराला अज्ञाताने पुन्हा आग लावल्यामुळे उन्हाच्या कडाक्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दुपारच्या आगीमुळे डोंगराचे, झाडांचे मोठे नुकसान झाले; तर वन्य प्राण्यांना मोठी हानी पोहोचली. डोंगराला लागलेल्या आगीची माहिती सर्पमित्र स्वप्निल नरुटे यांनी व्हॉटस ॲप ग्रुपच्या माध्यमातून देताच परिसरातील सर्पमित्र पप्पू खोत, अक्षय मगदूम, सर्फराज पटेल, वनपाल घनश्याम भोसले, वनरक्षक गजानन सकटे, सागर यादव यांनी शर्थीचे प्रयत्न करून डोंगराला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला.
.............
जंगलांना आग लागू नये, जंगल सुरक्षित राहावे, यासाठी वन विभागाकडून झाळपट्टे काढले जातात. या वर्षी वनपाल, वनरक्षक आणि वनमजुराकडून झाळपट्टे काढले नाहीत. डोंगराला आग लागल्यानंतर वनविभागाकडून दुपारनंतर डोंगरावर झाळपट्टे काढण्याला सुरुवात झाली.
फोटो :
मजले येथील डोंगराला लागलेली आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करताना सर्पमित्र आणि वनरक्षक.