राम मगदूम - गडहिंग्लज -‘एव्हीएच’ प्रकल्पासाठी चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील ८५ एकर जागा ‘चतुराईने’मिळविल्यानंतर ‘एमआयडीसी’च्या निर्देशानुसार कंपनीने प्रकल्पाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला मिळविला. मात्र, हा दाखला मिळवतानाही प्रकल्पस्थळाच्या आजूबाजूची नैसर्गिक माहिती देताना लपवालपवी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच ‘चंदगडी’ जनतेसह पर्यावरणवादी आंदोलकांनी प्रकल्पास तीव्र हरकत घेतली आहे.‘प्रदूषण’चा ना-हरकत दाखला मिळवताना सादर केलेल्या कंपनीच्या प्रकल्प अहवालातच मोठा विरोधाभास दिसूनयेतो.शासनाच्या सर्व अटींची पूर्तता कागदोपत्री सोयिस्कररीत्या पूर्ण करण्यात आली आहे. ‘एव्हीएच’च्या कार्यस्थळाच्या परिसरात ताम्रपर्णी, तिलारी व मार्कंडेय या तीन नद्या, तसेच जंगमहट्टी पाटबंधारे प्रकल्पासह २४ बंधारे आहेत. कर्नाटकातून येणाऱ्या जंगली हत्तींचा मार्गही याच परिसरात आहे. कलानंदीगड हा ऐतिहासिक शिवकालीन किल्लादेखील याच भागात आहे. कंपनीच्या कार्यस्थळापासून दहा किलोमीटर अंतराच्या परिघात कलिवडे, आंबेवाडी, महिपाळगड व तिलारी ही चार राखीव जंगले आहेत.निसर्गसंपन्न अशा या परिसरात वाघ, बिबट्या, हत्ती, गवे अशा विविध प्रकारच्या वन्यप्राण्यांचाही वावर आहे. तथापि, कंपनीने दाखवलेल्या पर्यावरणविषयक कागदपत्रावर या भागातील परिपूर्ण नैसर्गिक माहिती दिसत नाही. ‘पर्यावरण’आणि ‘प्रदूषण’चे दाखले मिळविण्यासाठी खरी वस्तुस्थिती ‘खुबीने’ लपविण्यात आली आहे.कर्नाटक राज्याची हद्द प्रकल्प स्थळापासून अवघी चार किलोमीटर असतानाही ती दहा किलोमीटरच्या बाहेर दाखवण्यात आली आहे. कारण कर्नाटकातील खेडी प्रकल्पाच्या दहा किलोमीटर अंतराच्या परिघात दाखविली असती, तर आंतरराज्य हद्दीमुळे कंपनीला ‘जनसुनवाई’ला सामोरे जावे लागेल असते. प्रकल्पाबद्दलची खरी माहिती जनतेला सांगावीच लागली असती.वस्तुस्थिती समजल्यानंतर प्रकल्पाला सुरुवातीच्या काळातच जनतेचा विरोध झाला असता. प्रकल्पास विरोध होऊ नये म्हणून ‘जनसुनवाई’ टाळण्यासाठीच पर्यावरण व प्रदूषणाचा ना-हरकत दाखला मिळविताना अपुरी व चुकीची माहिती देण्याचा खटाटोप झाला आहे, असा आंदोलकांचा आरोप आहे.अशी झाली लपवाछपवी‘एव्हीएच’कार्यस्थळाच्या दहा किलोमीटर अंतराच्या परिघात अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कर्नाटक राज्यातील कुद्रेमनी व धामणे ही दोन गावे दाखविण्यात आलेली नाहीत.‘एव्हीएच’ कार्यस्थळाच्या परिसरात ताम्रपर्णी, तिलारी व मार्कंडेय या तीन नद्या आहेत. मात्र, यापैकी ताम्रपर्णी ही एकच नदी दाखविण्यात आली आहे.कलानंदीगड हा शिवकालीन किल्ला याच परिसरात असतानाही कंपनीच्या प्रकल्प अहवालात त्याचा उल्लेख नाही.चंदगड तालुक्यात सरासरी ३५०० ते ४००० मि.मी. पाऊस पडतो. मात्र, हे पर्जन्यमान केवळ १५०० मि.मी. दाखविण्यात आले आहे.चंदगड तालुक्याच्या हवामानाची माहिती देताना बेळगावच्या हवामानाचा माहितीचा डाटा वापरण्यात आला आहे.
‘प्रदूषण’चा दाखला मिळवताना ‘लपवाछपवी’
By admin | Updated: February 27, 2015 23:20 IST