राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’चे वातावरण चांगलेच तापले असून दोन्ही आघाड्यांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकीकडे आघाड्यांच्या प्रमुखांकडून ठरावांची गोळाबेरीज सुरू असताना, दुसऱ्या बाजूला आपल्या राजकारणातील अडसर ठरणारे पंधरा मोहरे ‘हिटलिस्ट’वर आहेत. त्यांच्यासाठी संबंधित तालुक्यांसह जिल्ह्यात यंत्रणा सक्रिय झाली आहे.
‘गोकुळ’ हे जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. हे ताब्यात ठेवण्यासाठी जसे नेत्यांमध्ये चढाओढ असते त्यापेक्षा अधिक उमेदवारीसाठी इच्छुकांमधून असते. दोन्ही पॅनेलमध्ये संधी मिळविण्यासाठी इच्छुकांनी निकराचे प्रयत्न केले. त्यातून अनेकजण नाराजही झालेत. काहींची नाराजी दूर करण्यात नेत्यांना यश आले, असे वाटत असले तरी उमेदवारी मिळाले नसल्याचे शल्य अनेकांना बोचत आहे. त्याचा राग पॅनेलवर काढला जाणार हे निश्चित आहे. त्याशिवाय काही तालुक्यातील पारंपरिक विरोधक एक झाले आहेत. नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांची मने जुळलेली नाहीत. त्यातून एकमेकांचे उट्टे काढण्याऱ्यांच्या प्रचारयंत्रणेने गती घेतली आहे.
‘गोकुळ’चे संचालक म्हणून निवडून आला तर त्याचा तालुक्यात प्रभाव राहतो. आता एकत्र असले तरी विधानसभेला ते आडवे येणार असल्याने त्यांना आताच रोखले तर उद्याची डोकेदुखी कमी होईल, यासाठी दोन तालुक्यांत यंत्रणा सक्रिय झाली आहे. गेली अनेक वर्षे सोबत केली आणि आता बाजूला गेलेल्यांच्या विरोधातही विशिष्ट यंत्रणा काम करत आहे. त्याचबरोबर साखर कारखान्यातील सत्तेचे राजकारण, ऐनवेळी उमेदवारी डावल्याने झालेला अपमान या रागापोटी पडद्यामागे अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. दोन्ही आघाड्यांतील पंधरा मोहरे ‘हिटलिस्ट’वर आहेत.
सत्तेसाठी काट्याची टक्कर होणार आहे, येथे फार मोठ्या फरकाने उमेदवार विजयी होणार नाहीत. त्यात निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या भांडवली गुंतवणुकीमुळे क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे विजयी आकडा गाठताना प्रत्येकाची दमछाक होणार आहे. अशा परिस्थितीत पाच-पन्नास मतेही अनेकांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार हे मात्र निश्चित आहे.
विजयाच्या गणितासाठी धडपड
आपणाला पॅनेलसह आपल्या गटातूनच टार्गेट होऊ लागल्याची कुणकुण संबंधितांना लागली आहे. त्यामुळेच त्या मतांच्या बेरजेसाठी धडपड सुरू झाली असून एका एका मतासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आहे.
मते न देण्यासाठी यंत्रणा
एकीकडे एका-एका मतासाठी जोडण्या लावल्या जात असतानाच दुसऱ्या बाजूला आपल्या विरोधकाला मते देऊ नये, यासाठी धडपडणारी यंत्रणा पाहावयास मिळत आहे.