देवाळे, इस्पुर्ली गावाच्या डोंगर माथ्यावर असणाऱ्या शेतजमिनीत नवीनच उभारणी सुरू असलेल्या स्टोन क्रशर प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्याच्या जमिनी नापीक होणार असून, याची पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचणार असून, हा प्रकल्प बंद करावा, अन्यथा करवीर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा देवाळे (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांनी हळदी (ता. करवीर) येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडली व इशारा दिला.
यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देवाळे, हळदी व दिंडनेर्ली या गावांतील डोंगर परिसरातला बहुतांश भाग प्रभावित होणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूचे सर्व क्षेत्र नापीक होण्याची भीती आहे. संबंधित प्रकल्प हा डोंगरमाथ्यावर असल्याने त्याच्यातून होणाऱ्या हवा प्रदूषणाचा परिणाम थेटपणे आजूबाजूच्या गावातील लोकांच्या आरोग्यावरती होणार आहे. याबाबत चार महिन्यांपूर्वी इस्पूर्ली तलाठी यांना लेखी तक्रार अर्ज करूनदेखील त्यांनी यात कोणतेही लक्ष घातले नाही. त्यामुळे एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण अधिकारी, जिल्हा खनिकर्म विभाग, तसेच करवीर
तहसीलदार या सर्वांना लेखी तक्रार देऊन देखील या तक्रारीची दखलसुद्धा घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. येत्या आठ दिवसांत या बांधकामाची चौकशी होऊन हा प्रकल्प थांबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली नाही झाल्यास आम्ही सर्व शेतकरी करवीर तहसीलदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सुभाष पाटील, बाबूराव पाटील, नेताजी पाटील, केरबा पाटील यांच्यासह प्रभावित क्षेत्रातील सर्व शेतकरी उपस्थित होते.