इचलकरंजी : लिंबूचौक परिसरात नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची २४ तासांतच खुदाई करून पुन्हा विल्हेवाट लावली जात आहे. हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. यावेळी भागातील नागरिकांनी या कामाला विरोध दर्शवित अधिकार्यांना धारेवर धरले. मात्र त्यालाही न जुमानता रस्ता खोदण्यात आला. लिंबूचौक ते शेळके मळा मार्गावर पाण्याची पाइपलाइन टाकण्यात येत आहे. सहा महिन्यांपूर्वी हे काम अर्धवटच करण्यात आले होते. त्यानंतर पुढील काम होण्यासाठी रस्ता डांबरीकरणाचे कामही प्रलंबित होते. दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने हा रस्ता डांबरीकरण करण्यास परवानगी दिली. त्यानुसार शुक्रवारी डांबरीकरण करण्यात आले. त्याला २४ तासही उलटले नाहीत तोवर शनिवारी सकाळी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने नव्यानेच केलेला रस्ता खोदण्यात आला. याची माहिती मिळताच भागातील नागरिक जमले व त्यांनी या कामास विरोध दर्शविला. तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजीराव कांबळे यांना धारेवर धरले. यावेळी शाब्दिक वादावादीही झाली. रस्ता करण्यापूर्वी नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना नळजोडणी, ड्रेनेज आदी कामे असतील तर करून घेण्यास सांगितले जाते. मात्र कामाची माहिती असतानाही प्रशासनाकडूनच रस्ता उकरून आपल्या उलट कामाची पद्धत दाखवूून दिली.
यावेळी नगरसेवक रवींद्र लोहार, पै. अमृत भोसले, अजय जावळे, सागर चाळके, सचिन जाधव, नागेश कुंभोजे, मनोज खोत, उदय निंबाळकर, धर्मराज जाधव, निखिल जमाले, मनोज खोत, नागेश कुंभोजे, संजय आरेकर, बंडोपंत धामणे आदींसह नागरिक उपस्थित होते.
फोटोनंतर देत आहे....