कोल्हापूर : येथील अत्यंत प्रथितयश उद्योजक, सरोज आयर्न इंडस्ट्रीजचे मालक आणि ज्यांनी कोल्हापूरचा फौंड्री उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला, असे उद्योजक परशुराम ऊर्फ बापूसाहेब शंकरराव जाधव (वय ८०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वाधिक आयकर भरणारा, कामगारांच्या कल्याणासाठी झटणारा आणि अत्यंत सेवाभावी उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त झाली. कोल्हापूरच्या समाजजीवनात त्यांची ओळख ‘बापू जाधव’ अशी होती. त्यांच्या पश्चात पत्नी विजयमाला, मुले दीपक, अजित, भरत, मुलगी सुनीता, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्याने बापूंना रविवारी (दि. ८) नागाळा पार्कातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी त्यांच्यावर पित्ताशयातील खडे काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, सकाळी साडेअकराच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. बापूंचे मूळ गाव सातवे (ता. पन्हाळा). सध्या ते प्रतिभानगर येथे राहत होते. त्यांचे बालपण उत्तरेश्वर पेठेत गेले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे कृपाछत्र हरविल्याने घरची जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. यानंतर त्यांनी शिवाजी उद्यमनगरमधील मेसर्स पाटोळे-जाधव आणि कंपनीमध्ये फौंड्रीमधील कामाचा अनुभव मिळविला. यानंतर जवाहरनगर येथे सन १९६४ मध्ये त्यांनी वाहन उद्योगासाठीच्या ‘सिलिंडर हेड’ निर्मितीकरिता सरोज आर्यन इंडस्ट्रीजची सुरुवात केली. यातील यशानंतर त्यांनी सन १९७८ मध्ये सरोज आयर्नचे शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये स्थलांतर केले. यानंतर गुणवत्तापूर्ण कामाच्या जोरावर त्यांनी सरोज फौंड्री प्रायव्हेट लिमिटेड, सरोज कास्टिंग, सोनाई इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडद्वारे उद्योगांचा विस्तार केला. कोल्हापूरसह देशाच्या उद्योगविश्वात त्यांनी सरोज उद्योग समूहाची वेगळी ओळख निर्माण केली. पुणे विभागातील उद्योजकीय क्षेत्रांतील आयकर भरणाऱ्या उद्योजकांमध्ये ते द्वितीय क्रमांकावर होते. उद्योगासह सामाजिक, क्रीडा, आदी क्षेत्रांत ते कार्यरत होते. कोल्हापूर इंजिनिअरिंंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, उद्यम को-आॅपरेटिव्ह सोसायटीमध्ये ते सक्रियपणे कार्यरत होते. त्यांंच्या निधनाचे वृत्त समजताच अंत्यदर्शनासाठी रुग्णालयात खासदार धनंजय महाडिक, उद्योजक सचिन मेनन, बाबाभाई वसा, बाबूराव हजारे, आदी उपस्थित होते. रुग्णालयातून त्यांचे पार्थिव हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील सरोज आयर्न या ठिकाणी नेण्यात आले. येथे सरोज उद्योग समूहातील कर्मचारी, औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर दुपारी चारच्या सुमारास प्रतिभानगरमधील ‘सोनाई’ या निवासस्थानी त्यांचे पार्थिव आणले. येथे ‘आयआयएफ’चे अध्यक्ष संजय पाटील, ‘स्मॅक’चे डी. डी. पाटील, सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, उद्यम को-आॅप. सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य तसेच उद्योग, राजकीय, आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी गर्दी केली होती. रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास पंचगंगा स्मशानभूमी येथे बापूसाहेब यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी होणार आहे. (प्रतिनिधी)अंत्यदर्शनासाठी गर्दीप्रतिभानगर येथील ‘सोनाई’ निवासस्थानातून बापू यांच्या अंत्ययात्रेला सायंकाळी सहा वाजता सुरुवात झाली. यात औद्योगिक, सामाजिक, राजकीय, आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सरोज उद्योगसमूहातील कामगारवर्ग सहभागी झाला होता. दरम्यान, महापौर हसिना फरास, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर, बाबाभाई वसा, आमदार अमल महाडिक, माजी महापौर शिवाजीराव कदम, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक सत्यजित कदम, शेखर कुसाळे, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, उद्योजक चंद्रकांत जाधव, आनंद माने, नितीन वाडीकर, रणजित जाधव, चंद्रशेखर डोली, साजिद हुदली, रणजित शहा, अतुल पाटील, संजय शेटे, प्राचार्य महादेव नरके, आदींनी बापूसाहेब यांचे अंत्यदर्शन घेतले.विविध पुरस्कारांनी सन्मान..उत्कृष्ट उद्योजकतेचा फाय फौंडेशन पुरस्कार (१९९१), होनेस्ट टॅक्स पेअर (सन १९९५ ते २०००), कोल्हापूर भूषण व जीईम आॅफ न्यू मिलेनियम अवॉर्ड (२०००), बेस्ट फौंड्रीमन अवॉर्ड (२००९) ने त्यांचा गौरव झाला होता.बापूंची नजर..अत्यंत हाडाचा उद्योजक अशी बापूंची ओळख होती. ते अत्यंत शांत स्वभावाचे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे होते. परदेशी कंपन्यांच्या कारच्या इंजिनचे सिलिंडर हेड नुसत्या नजरेने बघून कोणतेही ड्रॉइंग न वापरता तसाचा तसा पार्ट बनवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. बीएमडब्लू, मर्सिडिस बेंझ, जग्वार लॅन्डरोव्हर अशा कंपन्यांना ते सिलिंडर हेडचा पुरवठा करीत होते. कुटुंबीय, कर्मचाऱ्यांना धक्काखासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वी बापू यांचा दिनक्रम नित्यनियमाने सुरू होता. सायंकाळी ते सागरमाळ येथील उद्यानात फिरावयास जात होते. १५ ते २० दिवसांतून एकदा ते कंपनीमध्ये जात होते. मंंगळवारी सायंकाळी त्यांच्यावर पित्ताशयातील खडे काढण्याची शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, यापूर्वीच त्यांचे आस्कमिक निधन झाल्याने त्यांचे कुटुंबीय, उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांना धक्का बसला. आपल्या कर्मचाऱ्याला कुटुंबाचा घटक मानणाऱ्या बापू यांच्या निधनाचे वृत्त समजताच कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले.
उद्योजक बापू जाधव यांचे निधन
By admin | Updated: January 18, 2017 00:57 IST