लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सोयाबीनच्या आहारातील वापरामुळे आरोग्याची तंदुरुस्ती राहत असली तरी वाढलेला दर पाहून खिशाचे आरोग्य मात्र बिघडत चालले आहे. एक किलोला तब्बल १२० रुपये मोजावे लागत आहे. पहिल्यांदाच एवढा दर झाला आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने जागरुक ग्राहकही खरेदी करताना खिशाचे वजन तपासू लागले आहेत.
सोयाबीनमध्ये कार्बोहायड्रेट जास्त असल्यामुळे त्याचा वापर थेट आहारात करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. चपातीसाठी गव्हाचे पीठ दळताना त्यात सोयाबीनही टाकले जाते. चपातीची पौष्टिकता वाढवणे हा त्यामागचा उद्देश असतो. याशिवाय लहान मुलांना सोयाबीन पावडर दिली जाते. जिमला जाणारे तर सोयाबीन भाजून खातात. या सर्वामुळे किरकाेळ बाजारात सोयाबीनची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेऊन किराणा मालाच्या दुकानातही किरकोळ विक्रीसाठी सोयाबीन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
गेल्या मार्चपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत चालली आहे. क्विंटलचा चार हजारांवर असणारा दर आता १० ते ११ हजारांवर पोहोचला आहे. घाऊक दरात दुप्पटीने वाढ झाल्याने किरकोळच्या दरातही त्याच पटीत वाढ झाली आहे. साधारपणे ५० ते ६० रुपये असा किलाेचा दर होता. तो आता १२० रुपये झाला आहे. त्यामुळे नियमित ग्राहकही आता दहावेळा दराची विचारणा करू लागले आहेत.
चौकट
प्रतिक्रिया
सोयाबीनचा काढणी हंगाम सुरू असल्यामुळे टंचाई अजिबात नाही. ग्राहकांच्या मागणीएवढा उपलब्ध करून दिला जात आहे.
मनोज नष्टे,
किरकोळ विक्रेते, लक्ष्मीपुरी धान्य लाइन
चौकट
का खातात सोयाबीन
कोरोनाकाळात तर इम्युनिटी वाढविण्यासाठी म्हणून विविध प्रकार समोर आले, सोयाबीनचा आहारात थेट वापर हे त्यापैकी एक. सोयाबीनमध्ये असलेल्या हाय प्रोटिनमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याचे सांगितले जात असल्याने त्याचा आहारात वापर वाढला आहे. हाडे मजबूत होत असल्याने व्यायामानंतर सोयाबीन हमखास खाल्ले जात आहे. बी कॉम्प्लेक्स आणि ई जीवनसत्त्वासह ॲमिनो ॲसिडचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा खाण्यातील वापर वाढला आहे.
चौकट
सोयाबीनचा किरकोळ दर प्रतिकिलो : १२० रुपये
घाऊक दर : १० ते ११ हजार रुपये क्विंटल