कोल्हापूर : जिल्ह्यातील सोनोग्राफी मशीन, वैद्यकीय गर्भपात केंद्र व सोनोग्राफी मशीन कोडिंगच्या कामाचा जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आज, शनिवारी आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.जिल्हाधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय ’पीसीपीएनडीटी’ दक्षता पथकाची बैठक झाली. यावेळी जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रांतील सुरू असलेली, तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी बंद असलेल्या सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रांचा, सोनोग्राफी मशीन कोडिंग कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यात एकूण नोंदणी केलेली ३७६ सोनोग्राफी केंद्रे असून, त्यापैकी २३७ केंद्रे चालू अवस्थेत असून, १३९ सोनोग्राफी केंद्रे बंद आहेत. कोल्हापूर ग्रामीणमध्ये कोड दिलेल्या एकूण १६७ सोनोग्राफी मशीन असून महानगरपालिका क्षेत्रात २०४ मशीन आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रांचा समुचित प्राधिकारी यांच्यामार्फत केलेल्या तपासणी कामाचा आढावाही जिल्हाधिकारी माने यांनी यावेळी घेतला. त्याशिवाय सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर दाखल केलेला न्यायालयीन खटला, टोल फ्री क्रमांक, ‘आमची मुलगी डॉट कॉम वेबसाईट’ व प्राप्त झालेल्या तक्रारींचा व कार्यवाहीचा तसेच तालुका, जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रांतील स्त्री-पुरुष लिंग प्रमाण याचाही त्यांनी आढावा घेतला.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, डॉ. मिलिंद पिशवीकर, डॉ. सुनील कुबेर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रशासन अधिकारी ए. एम. खडतरे, पोलीस अधिकारी एम. एस. जगताप, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली सोनोग्राफी केंद्रांची माहिती
By admin | Updated: September 7, 2014 00:44 IST