राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरात जुलै महिन्यात आलेला महापूर ओसरुन दोन महिने उलटले तरी पिकांची नुकसानभरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्य शासनाने १६ सप्टेंबरला पिकांची नुकसानभरपाई वगळून इतर मदतीसाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी १४८ कोटी ६७ लाख रुपये मदत मिळणार आहे; मात्र पिकांच्या नुकसानीबाबत कोणताच निर्णय न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अतिवृष्टी व महापुराने शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी उद्ध्वस्त झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनाम्याचे काम पूर्ण होऊन भरपाईचा अहवाल शासनाकडे सादर होऊन महिना उलटला. मुळात शासनाने पिकांच्या नुकसानभरपाई २०१९ पेक्षा कमी केल्याने त्याविरोधात ‘स्वाभिमानी’ने जलसमाधी आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०१९ प्रमाणेच शेतकऱ्यांना भरपाई मिळेल असे सांगितले. त्यानुसार शासनाने १६ सप्टेंबरला नुकसानीचा अध्यादेश काढला, यामध्ये मृत जनावरे, पूर्णत: नष्ट अथवा अंशत: पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, झोपडी, गोठे, मत्स्य बोटी व जाळी, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुटपालन शेड, शेतजमिनीचे झालेल्या नुकसानीपोटी ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी देत शासनाने अध्यादेश काढला आहे; मात्र यामध्ये पिकांच्या नुकसानीचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. महापूर ओसरुन दोन महिने उलटले आहेत; मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. महापुराने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झालेले जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांचे ७३ हजार ९२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यातून ९४ कोटी ५२ लाखांचे नुकसान झाले आहे. एकूण नुकसानीपैकी ५३ हजार हेक्टर (७२ टक्के) क्षेत्र हे करवीर, पन्हाळा, शाहूवाडी व शिरोळ तालुक्यातील आहे.
सर्वाधिक नुकसान उसाचे
‘पंचगंगा’, ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘दूधगंगा’, ‘कासारी’ आदी नद्यांच्या काठावरील ऊस पिकांचे पुराने मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ५९ हजार ६४० हेक्टरवरील ऊस बाधित झाला आहे.
कोट-
गेली तीन वर्षे नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा तर महापुराने कंबरडे मोडले असून विकास संस्थांकडून घेतलेली कर्जे परत करायची कशी? असा प्रश्न आहे. शासनाने केवळ मदत जाहीर केली; मात्र अजून हातात काहीच पडले नसल्याने जगायचे कसे?
- मिलिंद पाटील (शेतकरी, कसबा बावडा)
पिके वगळता अशी मिळणार भरपाई -
कपडे, भांडी, इतर वस्तू - २७. ६३ कोटी
मृत जनावरे - ४० लाख
घरांची पडझड - ४५. ९८ कोटी
शेतजमीन - ३.०३ काेटी
मत्स्य व्यवसाय - ९.३१ कोटी
हस्तकला, कारागिर, बारा बलुतेदार - ६.२५ कोटी
दुकानदार - ५२.२८ काेटी
टपरीधारक - १.६६ कोटी
कुक्कुटपालन शेड - २.१० लाख
सार्वजनिक क्षेत्रातील कचरा उठाव - २.०७ कोटी
एकूण - १४८.६७ कोटी