कोल्हापूर : दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून आंदाेलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी कोल्हापुरातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी, अशा घोषणा देण्यात आल्या.
निदर्शने केल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात केंद्र शासनासोबत शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या चर्चेच्या नऊ फेऱ्या होऊनही तोडगा निघालेला नाही, कारण केंद्र शासनाची भूमिका नकारात्मक आहे. गेले ५४ दिवस पाऊस, थंडी-वाऱ्यात हजारो शेतकरी, स्त्रिया शांततेत आंदोलन करत आहेत. परंतु, केंद्र शासन सकारात्मक पाऊल टाकायला तयार नाही, हे विदारक चित्र आहे. शेतकऱ्यांना समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा आहे, याच एकजुटीचे दर्शन घडावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे म्हटले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी निदर्शने करुन आम्ही शेतकऱ्यांना एकाकी पडू देणार नाही, हे दाखवून दिले आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी जे काही आंदाेलन करावे लागेल ते आम्ही करु, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी अध्यक्ष वसंत डावरे, सरचिटणीस अनिल लवेकर यांच्यासह सरकारी कर्मचारी उपस्थित होते.
--
फोटो नं २१०१२०२१-कोल-सरकारी कर्मचारी निदर्शने
ओळ : दिल्लीत आंदाेलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--