कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन खासगी शाळांच्या फीमध्ये सवलतीची मागणी केली. कोरोना व लॉकडाऊनमुळे पालकांची पूर्ण फी भरण्याची परिस्थिती राहिलेली नसल्यामुळे नाममात्र फी घेऊन या शैक्षणिक सत्राची सांगता करावी, असे आदेश काढावेत, अशी विनंती करण्यात आली.
कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, संभाजीराव जगदाळे, लहुजी शिंदे, महेश जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मंत्री गायकवाड यांची भेट घेतली. यात २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास हरकत नाही; पण तीन महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण होणार का, ऑनलाइन अभ्यासक्रम विचारात घेतला जाणार का, याबाबत शंका उपस्थित केल्या. कर्नाटकच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घालावे या मागणीसह १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेची फी माफ करावी, अशीही मागणी केली.