सातारा : पूर्वी खांद्याला पिशवी अडकवून मुले शाळत जात होती; परंतु जसा काळ बदलला तशा फॅशनेबल सॅक आणि बॅगा बाझार पेठेत विक्रीस आल्या. या बॅगाबरोबरच मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझेही काळानुसार वाढत गेले; मात्र हे दप्तराचे ओझे अत्यंत धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. पाठीवर दप्तर अडकविल्यानंतर शरीराचा समतोल साधण्यासाठी मुले पुढे झुकतात. त्यामुळे भविष्यात मुलांना अनेक त्रास उद्भवून कुबड काढून चालण्याची सवयही लागण्याची शक्यता असते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तिसरी ते चौथीमध्ये शिकत असलेल्या चिमुकल्या मुलांच्या पाठीवर भले मोठे दप्तराचे ओझे पाहून भल्याभल्यांना घाम फुटण्यासारखी सध्या परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी शहरातील विविध शाळेत जाऊन चक्क मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे वजन केले. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या चिमुकल्या मुलांच्या क्षमतेपेक्षा तब्बल २५ टक्के जास्त वजन त्यांच्या पाठीवर असल्याचे उघड झाले. या मुलांच्या पाठीवर अडीच ते तीन किलो वजन कटाकटीने पेलू शकते; परंतु अनेक मुलांच्या पाठीवर साडेचार ते साडेपाच किलो वजन असल्याचे दिसून आले. मुलांच्या पाठीवर नेमके वजन किती असावे आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात, यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांचा अभिप्राय घेतला असता सध्या मुलांच्या पाठीवर असलेले दप्तराचे ओझे धोकादायकच असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. पाठीवरील क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे पाठ दुखणे, थकवा येणे अशी लक्षणे जाणवू लागतात. लहान मुलांना ही लक्षणे जाणवतात; पंरतु त्यांना याविषयी सांगता येत नाही. त्यामुळे जसजसे वय वाढेल तसे मुलांच्या चालण्या-बसण्यात वेगळेपणा दिसतो. त्यामध्ये कुबड काढून चालणे, बसणे, वाकणे अशा मुलांना सवयी लागतात. आपण डोक्यावर वजन ठेवून उभे राहिलो तर गुरुत्वाकर्षण मध्यावर येतो. त्यामुळे समतोल राहतो. परिणामी शरीराला जास्त धोकादायक ठरत नाही; परंतु पाठीवर क्षेमतेपेक्षा जास्त ओझे घेतले तर चिमुकल्या मुलांना लहानपणापासूनच पाठदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. (लोकमत चमू) मुलांची हमालासारखी स्थिती करू नका ! आपण बाजारपेठेमध्ये हमालांना गाड्यावरून माल वाहून नेताना पाहत असतो. हे हमाल त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त माल गाड्यावर ठेवतात. त्यामुळे त्यांना पुढे झुकून आणि वाकून चालावे लागते. या हमालांना भविष्यात पाठीचे आजार वाढत असल्याचे दिसून आले आहे. तशाचप्रकारे सध्याची चिमुकली मुलेही पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन एखाद्या हमालासारखी वाकलेली आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात या मुलांनाही अशाप्रकारचे आजार उद्भवू शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सॅक आणि आडवी बॅग पाठीवर अडकविल्यामुळे त्याचा भार मानेवर, मणक्यावर येतो. त्यामुळे मुलांना पाठ दुखणे, थकवा येणे, कुबड काढणे, माण दुखणे असे आजार उद्भवतात. त्यामुळे सहज पेलता यावं, असच वजन पाठीवर असावं. -डॉ. सुहास पोळ, (अस्थिरोग तज्ज्ञ)
दप्तरामुळं मुलांना येईल कुबड!
By admin | Updated: June 22, 2015 22:20 IST