कोल्हापूर : बंद पडलेली यंत्रसामग्री, अपुरे कर्मचारी व रुग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयी-सुविधा, असे चित्र ‘जिल्ह्याची आरोग्यवाहिनी’ समजल्या जाणाऱ्या येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) आज, मंगळवारी विधानमंडळ अंदाजसमितीच्या सदस्यांना दिसले. त्यांनी या प्रकाराबद्दल राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला धारेवर धरत उपस्थित डॉक्टर, कर्मचाऱ्यांना ‘खडे बोल’ सुनावले. ‘आम्ही आलोय म्हणून रुग्णालयाची साफसफाई केली काय?’ असा प्रश्न समितीतील सदस्यांकडून यावेळी विचारण्यात आल्यावर अधिकारी अवाक् झाले. तब्बल दीड तास रुग्णालयातील विविध विभागांत जाऊन प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधून सोयीबद्दल विचारपूस केली.सकाळी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीतील सदस्यांनी सर्वप्रथम महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांची भेट घेतली. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्या, रोज किती शस्त्रक्रिया होतात, राज्य शासनाकडून किती निधी मिळतो, अशी विचारणा समितीने डॉ. कोठुळे यांच्याकडे केली. त्यानंतर समिती रुग्णालय परिसरात बसलेल्या अपंग युवकांशी चर्चा केली. त्यांनी दाखला वेळेत मिळतो का? डॉक्टर वेळेत येतात का? अशी विचारणा केली. त्यावर घाबरत घाबरत येतात, असे मोघम उत्तर दिले. त्यानंतर सर्जरी विभागात आले. या विभागात तर यंत्रसामग्री जुनाट असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी कोठुळे यांना यंत्रसामग्रीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करा, असे सांगत रुग्णांशी संवाद साधला. ते आॅर्थोपेडिक विभागात आले. या विभागात केवळ एकच भूलतज्ज्ञ असल्याने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मानदसेवेवर भूलतज्ज्ञ नेमा, असे सांगितले.सर्वाधिक चर्चेत व टीकेचा विभाग म्हणजे औषध विभाग होय. मात्र, याठिकाणी समितीने जुजबी चौकशी केली. त्यानंतर अपघात विभागात ही समिती आली. त्याठिकाणी शिकाऊ डॉक्टरांशी संवाद साधत किती डॉक्टर या विभागात काम करतात? त्यावर तीन शिफ्टमध्ये डॉक्टर असतात, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर समितीने डॉ. कोठुळेंना या विभागात डॉक्टरांची संख्या वाढवा, अशा सूचना केल्या. सीटी स्कॅन विभागात रोज किती रुग्ण येथे येतात, असे विचारल्यावर ३० ते ४० रुग्ण येतात, असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले. त्यानंतर ही समिती दूधगंगा इमारतीमधील स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग स्त्री व पुरुष विभागात आली. त्याठिकाणी समिती आल्यानंतर खिडक्यावर साचलेली जळमटे व कॉटची अपुरी संख्या यावर नापसंती व्यक्त केली. या इमारतीमधील अतिदक्षता विभाग, त्यानंतर हृदयशस्त्रक्रिया विभाग, नवजात बालक शिशु विभाग, मुलींचे वसतिगृह, ग्रंथालयाची पाहणी करून समिती वैद्यकीय महाविद्यालयाकडे रवाना झाली.
सीपीआरचे केले ‘पोस्टमॉर्टेम’
By admin | Updated: July 16, 2014 01:00 IST