कोल्हापूर : शहराचे पश्चिमद्वार असलेल्या गंगावेश ते रंकाळा स्टॅँड या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यात हरविलेल्या रस्त्यामुळे शहरवासीयांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागातील नागरिकही वैतागले आहेत. निधी आहे, पण ठेकेदार मिळेनात, अशा अवस्थेत सापडलेले महापालिका प्रशासन या रस्त्याकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गंगावेश ते रंकाळा स्टॅण्ड परिसर शहरातील सर्वाधिक गजबजलेला परिसर आहे. शहरात पश्चिम भागातून येणार्या ग्राहकांचा सर्वाधिक वावर या परिसरात असतो. महाद्वार रोड, रंकाळा, गुजरी, महालक्ष्मी मंदिर, पापाची तिकटी या पर्यटन व व्यावसायिक ठिकाणांकडे जाणार्यांची संख्या मोठी आहे. मात्र या सर्व ठिकाणांना जोडणारा मुख्य रस्ता अखेरची घटका मोजत आहे. रस्त्यावर सहा इंचापासून दीड फूट खोलीच खड्डे पडले आहेत. कंबरडे मोडणारे रस्ते दुरुस्त कधी होणार, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.नागरिकांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. १०८ कोटी रुपयांची नगरोत्थान योजना मंजूर होऊन चार वर्षे झाली. ३९ किलोमीटर रस्त्यापैकी फक्त ३० टक्के रस्त्यांचेच काम झाले आहे. प्रशासकीय व राजकीय ‘लकवा’ धोरणामुळे रस्ते रखडले आहेत. याचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे.(प्रतिनिधी)
शहराचे पश्चिमद्वार गेले खड्ड्यात ! रस्त्याची अक्षरश: चाळण : निधी आहे; पण ठेकेदार मिळेनात
By admin | Updated: May 14, 2014 00:47 IST