कोल्हापूर : मुखी विठ्ठलनामाचा गजर...हाती भगवी पताका, डोक्यावर पांढरी टोपी, गळ््यात टाळ, तर महिलांच्या डोईवर तुळशी वृंदावन, टाळ मृदंगाचा गजर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांसह महाराष्ट्रातील विविध संतांच्या प्रतिमा, फुलांनी सजलेला रथ, पालखी, अशा वातावरणात कोल्हापूर-नंदवाळ दिंडी अमाप उत्साहात झाली.श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाच्यावतीने गेल्या ११ वर्षांपासून या कोल्हापूर-नंदवाळ पायी दिंडीचे आयोजन केले जाते. आज, सकाळी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात महालक्ष्मी दिनदर्शिकेचे मालक सदाभाऊ शिर्के यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती झाली. त्यानंतर चांदीच्या पादुका आणि पालखी पूजन झाले. यावेळी बाळासाहेब पोवार, दीपक गौड, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, सखाराम चव्हाण, नगरसेवक आर. डी. पाटील उपस्थित होते. त्यानंतर विणेकरी, टाळकरी, मानाचे अश्व, मानदंड धरणारे मानकरी आणि विठ्ठलनामाचा गजर करणारे वारकरी, अशी पायी दिंडी सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्ध रितीने भजन, कीर्तन करत दिंडी बिनखांबी गणेश मंदिर येथून मार्गस्थ झाली. ही दिंडी निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, खंडोबा तालीम, जुना वाशी नाका, सानेगुरुजी वसाहतीमार्गे पुईखडी येथे आली. या दिंडी मार्गात नगरसेवक सत्यजित कदम, नगरसेवक उदय जाधव, सूर्योदय नागरी पतसंस्था, अरुणोदय ट्रस्ट, भागीरथी महिला संस्था अशा विविध व्यक्ती व संघटनांच्यावतीने फराळाचे वाटप करण्यात आले. या दिंडीत कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित होते. पुईखडी येथे अश्वगोल रिंगण सोहळा दुपारी बारा वाजता पार पडले. त्यावेळी पालखी पूजन व अश्वपूजन गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, आदील फरास यांच्या हस्ते करण्यात आले. अश्वाने ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात पाच फेऱ्या मारल्या. पालखी सोहळा नंदवाळच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, बाबासाहेब देवकर, महापौर सुनीता राऊत, करवीर पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी दर्शन घेतले. आनंदराव लाड, विठ्ठल गावडे, आदी उपस्थित होते. नंदवाळ येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी सोहळासडोली (खालसा) : टाळ-मृदंग, हरिनामाचा गजर व ‘धाव विठ्ठला, पाव विठ्ठला’चा जयघोष करीत कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याखोऱ्यातून खळाळणारा विठ्ठलभक्तीचा प्रवाह आज, बुधवारी नंदवाळ नगरीमध्ये विलीन झाला. पुईखडी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत अश्वरिंगण सोहळा ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात पार पडला.‘आधी नंदापूर, मग पंढरपूर’ असे म्हटले जाते. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला येथे विठ्ठलाचे वास्तव्य असते, असा दृढ विश्वास भाविकांचा असल्यामुळे नंदवाळ गावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे काल, मंगळवारपासूनच येथे दिंडीसह भाविक दाखल होत होते. आज पहाटे अडीच वाजता करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे, करवीरचे पोलीस निरीक्षक दयानंद ठोमे, सरपंच संगीता राबाडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. त्यानंतर रांगेतील भाविकांना चार तासांनी दर्शन खुले करण्यात आले. काल रात्रीपासून राधानगरी, सडोली, बाचणी, हळदी, महे व इतर गावांकडून वारकरी मंडळींच्या दिंड्या नंदवाळकडे रवाना झाल्या. भजन, अभंगांच्या तालात वारकरी मंडळींसह भाविक भान हरपून दिंडीमध्ये सहभागी झाले होते. अभंगांच्या तालात नृत्य, फुगडी, टाळांचा फेर यामुळे भक्तिमय वातावरणाचा महापूर ओसांडून वाहत होता.
अवघे शहरची झाले विठूमय...!
By admin | Updated: July 10, 2014 00:51 IST