एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहरात साडेसहा कोटी रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फायदा पोलीस प्रशासनाला मोठ्या प्रमाणात झाला आहे. वर्षभरात खून, चेन स्नॅचिंग, लूटमारीसारख्या ५० गंभीर गुन्ह्यंचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरात २६१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.शहरातील गंभीर गुन्हाचा तपास व विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यानुसार मुंबईच्या कंपनीकडून संपूर्ण शहरात ११० ठिकाणी २६१ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये शिवाजी पूल, टाऊन हॉल, शिवाजी पुतळा, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, कावळा नाका, तावडे हॉटेल, कसबा बावडा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी पुतळा, शाहू नाका, बागल चौक, राजारामपुरी, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ, टाकाळा, आदींसह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. या कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष पोलीस मुख्यालयात आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून हायफाय कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी चोवीस तास तीन कर्मचारी स्क्रीनवर लक्ष ठेवून असतात. शहरात नियमबाह्य" वाहन चालविणाऱ्या दुचाकी वाहनांचा नंबर नोंद करून तो शहर वाहतूक शाखेला पाठविला जातो. येथून संबंधित वाहनधारकास नोटीस पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते. तिबल सीट, सिग्नल तोडणे, एकेरी मार्गात घुसणे अशा वाहनधारकांना लक्ष्य केले जाते. रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हालचालीवर हा तिसरा डोळा नजर ठेवून आहे. आपणाला कोणीतरी पाहत आहे याची नागरिकांना कल्पनाही नसते. शिवाजी पुलानजीक वडणगे गावच्या हद्दीतील निर्जनस्थळी अंदाजे २२ वर्षांच्या युवतीचा खून झाला होता. या खुनाचा छडा वाशी नाका, रंकाळा स्टँड, दसरा चौक, शिवाजी पूल येथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आला.चार दिवसांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानक येथे दोन व्यक्तिंमध्ये पैशाची देवाण-घेवाण झाली होती. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीने माझ्याकडून पैसे नेल्याची फिर्याद एका व्यक्तीने दाखल केली.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोघेही मित्र होते. त्यांनी संगनमत करून ही रक्कम घेऊन मूळ मालकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा हा बनाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आला. या कॅमेऱ्यांमुळे चेन स्नॅचिंग, लूटमार, चौकात, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हाणामाऱ्या असे ५० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. फिरत्या कॅमेऱ्यांचा फायदाशहरात संवेदनशील चौकात हायस्पीडचे १७ कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे ३६० कोनात चारी दिशांना फिरतात. बाहेरुन शहरात प्रवेश करणारे वाहन या कॅमेऱ्यात नजरकैद होते. जिल्ह्यांतील ३१ पोलीस ठाण्यांना या कॅमेऱ्यांचा अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये फायदा होत आहे. दोन अधिकारी, पंधरा कर्मचारीसीसीटीव्ही नियंत्रण कक्षामध्ये दोन अधिकारी व पंधरा कर्मचारी नियुक्त केले आहेत. चोवीस तास ड्युटीप्रमाणे तीन कर्मचारी सीसीटीव्ही स्क्रीनवर नजर ठेवून असतात.
सीसीटीव्हीमुळे पन्नास गुन्ह्यांच्या तपासात हातभार
By admin | Updated: July 17, 2017 00:14 IST