शिवराज लोंढे -- सावरवाडी -गतवर्षी कमी पावसाचा परिणाम म्हणून पंचगंगा, भोगावती नदीपात्रातून पाणी उपसावर निर्बंध घातले गेले होते. पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न शेती व्यवसायासमोर उभा होता. याचा गंभीर परिणाम गतवर्षी ऐन उन्हाळा हंगामात ऊस पिकांना सोसावा लागला. पाण्याअभावी ऊसपिके करपून गेली होती. पंचगंगा-भोगावती नदीतीरावरील शेतीतून यावर्षी साखर कारखान्यांना यंदाच्या ऊस गळीत हंगामात आठ लाख ऊस टन घटणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा आर्थिक फटका बसणार हे सत्य आहे.पाटबंधारे खात्याने गतवर्षी पंचगंगा नदीवर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०१६ या हंगामात पाणी उपसा बंदी जारी केली होती, तर भोगावती नदीवर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत उपसा बंदी होती. मे महिन्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई सर्वत्र निर्माण झाल्याने शेतीपिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसला होता. शेतकऱ्यांना शेतीपिकांना पाणी मिळण्यासाठी फार यातना सोसाव्या लागल्या. सहकारी पाणीपुरवठा संस्थांद्वारे शेतीपिकांना पाणी मिळाले नसल्याने ऊसपिकांचे खोडवा, बोडवा, आडसाली लागण यांचे मोठ्या प्रमाणात वाळून नुकसान झाले. शेतकऱ्यांनी वाळलेली ऊसपिके काढून टाकली, तर अनेक भागांत टँकरद्वारे ऊसपिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती, पण मे व जून महिन्यात पाऊस अपेक्षित पडला नसल्यामुळे ऊसपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.५ नोव्हेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांचे धुराडे पेटल्याने साखर कारखान्यांकडून गतवर्षी पंचगंगा व भोगावती नदीकाठ परिसरात पाण्याअभावी वाळून गेलेल्या ऊसपिकांची अगोदर उचल होणे गरजेचे आहे. गतवर्षी उन्हाळा हंगामात पाणीपुरवठा न झाल्याने नदीकाठच्या शेतीमध्ये ऊस वजनात यंदा कमालीची घट होणार हे सत्य आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामावरही परिणाम होणार आहे. नदीकाठच्या परिसरात उसाचे उत्पादन घटले जाणार असून, त्याचा यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.पाणी उपसाबंदीमुळे ऊस उत्पादन घटणार असल्याने रासायनिक खते, पाणीपट्टी, मशागत, भांगलण खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. शेतीला पाणीच मिळाले नसल्यामुळे ऊसपिके वाळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गतवर्षी उन्हाळा हंगामातील पाणीटंचाईमुळे ऊस शेती पिकांचा राज्य शासनातर्फे सर्व्हे केला नसल्यामुळे वाळलेल्या पिकांना विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळणार तरी केव्हा, हा प्रश्न निर्माण होऊ लागला. शेतीपिकातून झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? पाणीपट्टी माफ होणार का? यासारख्या प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.साधारणत: भोगावती पंचगंगा नदीकाठच्या परिसरातील कुंभी-कासारी, भोगावती, राजाराम, डी. वाय. पाटील या साखर कारखान्यांना यंदाच्या ऊस गळीत हंगामात ऊसटंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची गाळपक्षमताही घटणार आहे. शेती व्यवसायासमोर सध्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. बागायत शेतीला मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शेतीपिकांना पाणीटंचाईची झळ चांगलीच बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यावर्षी नदीकाठच्या परिसरात ऊसटंचाई भासणार असून, साखर कारखान्यांनी नदीकाठच्या शेतीला जादा भाव देणे गरजेचे आहे.- शंकरराव पाटील, अध्यक्ष, करवीर तालुका काँग्रेस उन्हाळा ऋतुमध्ये शेतीपिकांना पाणी मिळाले नसल्याने राज्य शासनाने नदीकाठच्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी रद्द करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लढा उभारावा.- राजेंद्र सूर्यवंशी, सदस्य, करवीर पंचायत समितीपाणीपट्टी रद्द मागणीसाठी लढ्याची गरज उन्हाळा ऋतुमध्ये पाणीटंचाईचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसला. ऊसपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी रद्द करण्याच्या मागणीचा लढा उभारणे गरजेचे आहे.
उपसाबंदीमुळे उसाचे उत्पादन घटणार
By admin | Updated: November 9, 2016 23:28 IST