राजाराम लोंढे- कोल्हापूर --अधिवेशनातून गोळा होणारा पैसा पुन्हा एकदा शिक्षक संघाच्या फुटीला कारणीभूत ठरणार आहे. याच कारणावरून शिक्षक नेते शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांच्यातील लढाई संपूर्ण राज्यात गाजली. थोरात यांना हाताशी धरून राज्याध्यक्ष पद पदरात पाडून घेतल्यानंतर आता राजाराम वरुटे व थोरात यांच्यात लढाई सुरू झाली आहे. अध्यक्ष झाल्यापासून वरुटे यांनी थेट मंत्र्यांशी वाढविलेली जवळीकता व एकहाती कारभार हाच त्यांना अडचणीचा ठरल्याचे बोलले जाते. एकेकाळी माजी आमदार शिवाजीराव पाटील सांगेल तसे शिक्षक संघाचे पान हलत होते. मात्र, संभाजीराव थोरात आणि पाटील यांच्यात ओरोस येथील अधिवेशनात संघर्षाची पहिली ठिणगी पडली. शिक्षक संघाची दोन शकले पडली आणि शिक्षक संघ नेमका कोणाचा हा वाद न्यायालयात पोहोचला. संघाच्या दुहीचा नेत्यांनाच फटका बसू लागल्याने ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांचे मनोमिलन झाले; पण या नेत्यांत फार दिवस सख्य राहिले नाही. थोरात यांच्या राज्याध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर पुन्हा संघांतर्गत राजकारणाने उफळी घेतली. संघाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजाराम वरुटे यांनी थोरात यांना जवळ करीत थेट राज्याध्यक्ष पदापर्यंत मजल मारली. मात्र, शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करताना राजकीय मंडळींच्या आहारी कधी गेले हेच त्यांना कळले नाही. वरुटे यांच्या काळात एक अधिवेशन व एक राज्यस्तरीय परिषद घेतली होती. यातील पैशावरूनच थोरात व वरुटे यांच्यात संघर्ष सुरू झाला. कोट्यवधीचा निधीराज्यात शिक्षक संघाकडे सुमारे दोन लाख शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी सुमारे एक लाख शिक्षक अधिवेशनाला उपस्थित राहतात. त्यांच्याकडून पाच कोटी रुपये निधी जमा होतो. अधिवेशन खर्च दीड कोटी वजा जाता तीन-साडेतीन कोटी रुपये संघटनेकडे शिल्लक राहतात. या हिशेबातूनच नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. वरुटेंना संगत नडली!राजाराम वरुटे तसे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले. स्वच्छ प्रतिमा व शिक्षकांबद्दलच्या आत्मीयतेमुळे त्यांनी संघाच्या तालुकाध्यक्षपदापासून थेट राज्याध्यक्षपदापर्यंत मजल मारली; पण राज्याध्यक्ष झाल्यापासून त्यांना विचार पटत नसतानाही काही मंडळींशी जुळवून घ्यावे लागत होते. हेच त्यांना नडल्याची चर्चा सध्या शिक्षकांमध्ये सुरू आहे.
शिक्षक संघाच्या एकीत पुन्हा पैशावरूनच ‘बेकी’
By admin | Updated: August 25, 2014 00:03 IST