कोल्हापूर : शेतीतील ऊसतोडणीच्या कारणावरून एकाने आपल्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार करवीर तालुक्यातील दोनवडे येथे घडला. संभाजी ज्ञानू पाटील (वय ४४) असे जखमीचे नाव असून, हल्ला करणारा त्यांचा भाऊ बाजीराव ज्ञानू पाटील (६२, रा. दोनवडे) याला करवीर पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संभाजी व बाजीराव पाटील या दोघा सख्ख्या भावांत शेतीच्या कारणांवरून अनेक दिवस वाद सुरू आहे. मंगळवारी (दि. १) संभाजी पाटील हे गावातील टेकाचा माळ नावाच्या शेतात ऊसतोडणी करीत असताना संशयित आरोपी बाजीराव तेथे आला. त्याने संभाजी यांना ‘तू ऊस का तोडतोस?’ असा जाब विचारत ठार करण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने हल्ला केला. संभाजी यांनी वार चुकवला; पण त्यांच्या मानेवर डाव्या बाजूला कुऱ्हाडीचा घाव लागून ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात संभाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भाऊ बाजीराव पाटील याला अटक केली.
(तानाजी)