(फोटो)
०२१२२०२०-आयसीएच-०४ (जखमी अमर मगदूम)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील आवळे गल्लीतील तीनपानी जुगार अड्ड्यावर तीन दिवसांपूर्वी छापा टाकून केलेल्या कारवाईतील एका संशयिताने बुधवारी न्यायालयाच्या आवारात रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. न्यायालय आवारातील पोलिसांनी सतर्कतेने त्याला ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयात दाखल केले. अमर निवृत्ती मगदूम (वय ४५, रा. वेताळ पेठ) असे त्याचे नाव आहे. गावभाग पोलिसांनी मुंडण केल्याच्या नैराश्येतून त्याने हा प्रकार केल्याचे सोबत आलेल्या इतर संशयितांकडून सांगण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आवळे गल्लीत तीन पानी जुगार अड्ड्यावर २९ नोव्हेंबरला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला होता. या कारवाईत अमर मगदूम याच्यासह चौदाजणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली. अटक केल्यानंतर गावभाग पोलिसांनी सर्व चौदा संशयित आरोपींचे मुंडण केले होते. त्यामुळे अमर हा दोन दिवस त्या नैराश्येत होता. बुधवारी सायंकाळी अमर याने अचानकपणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात येऊन अंगावर रॉकेल ओतून घेतले. पेटवून घेण्याचा प्रयत्न करीत असताना परिसरातील उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे न्यायालय आवारात बंदोबस्तासासाठी असलेल्या पोलिसांनी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून, रुग्णालय परिसरात मुंडण केलेले इतर संशयित व नातेवाइक, मित्र यांनी गर्दी केली होती. तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चौकट
गुन्हा दाखल करणार
अमर मगदूम याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर ३०९ नुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितले.