कोल्हापूर : अखंड महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा कुटील डाव सरकारचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे खेळू पाहत आहेत. त्यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने मंगळवारी दुपारी अणे यांची शहरातून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यानंतर या अंत्ययात्रेतील तिरडी शिवसैनिकांनी घोषणा देत, शंखध्वनी करीतच जयंती नाल्यात फेकली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.श्रीहरी अणे हे राज्याने नेमलेले महाधिवक्ते असल्याने त्यांनी फक्त राज्याच्या वतीने न्यायालयात राज्याची बाजू मांडायची आहे. त्यांनी कायद्याची बंधने व मर्यादा यांचे भान बाळगणे गरजेचे होते; पण अणे यांनी त्यांचे उल्लंघन करून विधिमंडळाच्या अखत्यारितील बाबींमध्ये हस्तक्षेप करून केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेने अणे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. या आंदोलनाला येथील पद्मा चित्रमंदिर चौकातून प्रारंभ झाला. वर्दळीच्या रस्त्यावरून ही प्रतीकात्मक अंत्ययात्रा निघाल्याने अनेकांचा तो कौतुकाचा विषय ठरला. ही अंत्ययात्रा जयंती नाल्यावर पोहोचल्यानंतर तेथे विधीवत अंत्यसंस्कार करीत शिवसैनिकांनी शंखध्वनी व अणे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर खांद्यावरून आणलेली तिरडी जयंती नाल्यात फेकून देऊन पुन्हा निषेधाच्या घोषणा दिल्या. या प्रतीकात्मक अंत्ययात्रेत महिलांचाही सहभाग होता.या आंदोलनात माजी जिल्हाध्यक्ष रवी चौगुले, शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, बाजीराव पाटील, सुजित चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, हर्षल सुर्वे, कमलकार जगदाळे, सुनील पोवार, विजय नाईक, अवधूत साळोखे, विराज पाटील, राजू यादव, राजेंद्र पाटील, दिनेश परमार, दिलीप देसाई, महेश उत्तुरे, उदय सुतार, संजय स्वामी, महिला आघाडीच्या अध्यक्षा शुभांगी साळोखे, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, सुमन शिंदे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
शिवसेनेकडून अणे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By admin | Updated: March 23, 2016 00:16 IST