राजाराम लोंढे-कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यांत सरासरी ८१ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वाधिक ९२ टक्के पेरणी ही सातारा जिल्ह्यात झाली आहे. पाण्याखालील पिके जोमात असली तरी हलक्या जमिनीतील पिकांवर पाण्याचा ताण जाणवत आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची सारी मदार ही रब्बी पिकांवर आहे. विशेषत: सांगली व सातारा जिल्ह्यांत त्याचा परिणाम दिसत आहे. सातारा जिल्ह्यात २ लाख १७ हजार ६०० हेक्टर हे सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी तब्बल २ लाख १ हजार २५१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झालेली आहे. ज्वारी, गहू, मका, हरभराची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. जिल्ह्यात उसाचे सरासरी ६२ हजार ५४० हेक्टर इतके क्षेत्र आहे. त्यापैकी २९ हजार २१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. आडसाली पीक वाढीच्या अवस्थेत असून पूर्वहंगामी उसाची उगवण चांगली आहे. रब्बी पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे सुरू असून आडसाली ऊस पिकांवर काही प्रमाणात खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात ज्वारीचे १ लाख ६३ हजार ४७० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८९ हेक्टरवर (८६ टक्के) पेरणी झाली आहे. ज्वारी पिके वाढत असून काही ठिकाणी पाण्याचा ताण जाणवत आहे. गहू, हरभरा, मका पिकाची लागवडही चांगली आहे. सरासरी ६४ हजार हेक्टरपैकी १७ हजार ६०१ हेक्टरवर उसाची लागवड झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र कमी असते. केवळ १४ हजार ९८ हेक्टरवर (३५ टक्के) पेरणी झालेली आहे. गहू, हरभरा, मक्याची पेरणी कमी आहे. ज्वारीची ७० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झालेली आहे. कृषी विमा योजना खुलीगारपीट, चक्रीवादळ, अपुरा पाऊस, कीडरोग प्रादुर्भाव आदींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदत राष्ट्रीय कृषी विमा योजनेतून मिळते. योजनेत सहभागी होण्यासाठी पेरणीपासून एक महिना अथवा ३१ डिसेंबर यापैकी जी आधी असेल ती, तसेच उन्हाळी भात, भुईमूग पिकासाठी ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे. ऊस पाचटसाठी पुढाकारपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने ऊस पाचट व्यवस्थापन व एक सरीआड पाणी देणे याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन कृषी विभागामार्फत सुरू आहे. त्याचबरोबर ठिबक, तुषार सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी विभागीय पातळीवर मोहीम उघडण्यात आली आहे.
कोल्हापूर विभागात ८१ टक्के पेरणी
By admin | Updated: December 24, 2015 00:30 IST