Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापुरात सर्वत्रच बहुरंगी लढती; ८१ जागांसाठी ३२५ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:28 IST2026-01-03T12:28:22+5:302026-01-03T12:28:36+5:30
‘मविआ’च्या पडझडीनंतरही काँग्रेसचे महायुतीपुढे आव्हान : तिसरी आघाडीही लढणार

Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापुरात सर्वत्रच बहुरंगी लढती; ८१ जागांसाठी ३२५ उमेदवार रिंगणात
कोल्हापूर : निवडणूक जाहीर होण्याआधीपासून रंगलेला कलगीतुरा, एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोप, उमेदवारांची नावे जाहीर करतेवेळी घेतलेली खबरदारी आणि त्यातूनही झालेली बंडखोरी अशा पार्श्वभूमीवर होत असलेली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट झाले.
निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. विशेषत: महायुतीसमोर काँग्रेसचे आव्हान असेल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ८२० उमेदवारी अर्जापैकी ४९५ अर्ज माघार घेतल्याने ३२५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
ही निवडणूक १५ जानेवारीस होत आहे. १६ ला मतमोजणी आहे. गतनिवडणुकीत काही मोजक्या जागा कमी पडल्यामुळे सत्तेपासून दूर राहिलेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सोबत घेत कोणत्याही परिस्थितीत महापालिकेची सत्ता ताब्यात घ्यायचीच असा निर्धार केला आहे. दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांची साथ सुटल्यानंतर एकाकी पडलेल्या विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांना उद्धवसेनेला बरोबर घेत महायुतीशी दोन हात केले आहेत.
वाचा : इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडीतच सामना, ६५ जागांसाठी २३० उमेदवार रिंगणात
महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी (शरद पवार), आम आदमी पक्ष बाहेर पडल्यामुळे प्रमुख जबाबदारी ही काँग्रेस आणि विशेष करून आमदार पाटील यांच्यावर येऊन पडली आहे. जनसुराज्य आघाडीने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्ष, बहुजन वंचित आघाडी व राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी तिसरी आघाडी स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकल्याने रंगत आली आहे.
२७४ उमेदवारांची माघार
या निवडणुकीसाठी एकूण ८२० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २१ छाननीत बाद झाले. माघारीच्या मुदतीत गुरुवारी दुपारी तीनपर्यंत २५३ अर्ज मागे घेतले गेले..
चव्हाण, फरास, कोडोलीकर यांची माघार
उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी महापौर हसीना फरास, कृष्णराज धनंजय महाडिक, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचा मुलगा प्रसाद चव्हाण, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, इंद्रजित सलगर, धनश्री तोडकर, योगिता प्रवीण कोडोलीकर, माजी नगरसेविका मायादेवी भंडारे अशा प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली. जनसुराज्य पक्षाची उमेदवारी घेतलेल्या प्रसाद चव्हाण यांनी माघार घ्यावी म्हणून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. फरास यांनी अमृता सुशांत पोवार यांच्यासाठी माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सगळी तयारी करून माघार घ्यावी लागल्याने योगिता कोडोलीकर यांना अश्रू आवरले नाहीत.
उमेदवारी माघारीचा तपशील
निवडणूक कार्यालय -- माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या
१. महासैनिक प्रशिक्षण केंद्र - ३०
२. व्ही. टी. पाटील सभागृह - २०
३. दुधाळी पॅव्हेलियन -- २८
४. राजोपाध्येनगर हॉल -- २५
५. गांधी मैदान पॅव्हेलियन -- ३६
६. यशवंतराव चव्हाण सभागृह -- ३७
७. ध्यानचंद हॉकी स्टेडियम -- २९