कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने फोंडा घाट ते कणकवली मार्गावर छापा घालून अवैद्य मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह १७ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हसन पापा शेख (रा. तुळजापूर नाका, पापनासनगर, उस्मानाबाद) या संशयितास अटक केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास मिळालेल्या माहितीनुसार संशयित शेख हा गोवा बनावटीचे मद्य तस्करी करून या मार्गावरून नेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या मार्गावर भरारी पथकाने फोंडाघाट (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) हद्दीतील फोंडाघाट ते कणकवली आयटीआयसमोरील मार्गावर संबंधित वाहन आल्यानंतर छापा मारला. त्यात अवैध मद्यसाठा मिळून आला. त्यामुळे वाहनासह १७ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, सुहास वरुटे, प्रदीप गुरव, दीपक कापसे, मंगेश करपे, रवींद्र सोनवणे आदी कर्मचाऱ्यांनी केली.