नवी दिल्ली : आपला विश्वास बसणार नाही, पण अमेरिकेत असे एक कॉलेज आहे, जिथे फक्त नापास विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. स्मिथ कॉलेज असे त्याचे नाव असून, मॅसाच्युसेट विद्यापीठाच्या सहयोगाने ते चालविण्यात येते. या कॉलेजमध्ये एक विशेष अभ्यासक्रम चालविला जातो, त्यात केवळ नापास विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकतात.या अभ्यासक्रमाला ‘फेलिंग वेल’ असे अनोखे नाव देण्यात आले आहे. नापास झाल्यानंतर आपल्या भविष्याबाबत चिंतित असलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. नापास झाल्याचे काही फायदेही आहेत, हे या विद्यार्थ्यांना शिकविले जाते. नापास झाल्याने भविष्य संपले असे होत नाही, अनेक पातळ्यांवर माणसाला करिअरच्या संधी मिळतातच, असे विद्यार्थ्यांच्या मनावर येथे बिंबविले जाते.आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे केवळ शालेय परीक्षेत अपयशी झाल्यावरच इथे प्रवेश मिळतो असे नाही. जीवनातील कोणत्याही प्रकारचे अपयश प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाते. अगदी प्रेम प्रकरणात अपयशी झाला असलात तरी तुम्हाला तेथे प्रवेश मिळू शकतो. आपण या कॉलेजात या, प्रेम प्रकरण, अभ्यास, नोकरी, मैदान या कुठल्याही पातळीवरील अपयश सांगा. त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळून जाईल. प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना नियमित वर्ग करावे लागतात. अपयशाला कसे हँडल करायचे, त्यातून आलेल्या निराशेवर कशी मात करायची याचे प्रशिक्षण वर्गात दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक प्रमाणपत्रही दिले जाते. हे कॉलेज सध्या चर्चेचा विषय बनले आहे. विशेष बाब अशी की, या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
विश्वास ठेवा अगर ठेवू नका, अमेरिकेतल्या या कॉलेजमध्ये मिळतो फक्त नापासांनाच प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:21 IST